सधन भागात करोनाचा आलेख वाढताच

बाधितांमध्ये मध्यम, उच्च मध्यम वर्गातील रुग्ण

बाधितांमध्ये मध्यम, उच्च मध्यम वर्गातील रुग्ण

अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : शहरात करोनाचा आलेख झपाटय़ाने उंचावत असताना बाधितांमध्ये मध्यम, उच्च-मध्यम वर्गातील रुग्णांचाच अधिक्याने समावेश असल्याचे दिसून येत आहे. प्रारंभी करोनाचा झोपडपट्टी, दाट लोकवस्तीच्या भागात शिरकाव झाला होता. हळूहळू तेथील रुग्ण कमी होऊन करोनाचा इमारती, बंगले अशा सधन भागाकडे प्रवास झाला. जवळपास आठ महिन्यांपासून तो याच भागात तळ ठोकून आहे. सध्या शहरात जेवढी प्रतिबंधित क्षेत्रे आहेत, ती सर्वच्या सर्व इमारतींमधील आहेत. झोपडपट्टीतील एकही क्षेत्र नाही. म्हणजे या भागातून तो जवळपास अंतर्धान पावल्याचे चित्र आहे.

करोना हा संसर्गजन्य आजार. निष्काळजीपणामुळे तो कधीही, कुठेही आणि कोणालाही गाठू शकतो. गरीब-श्रीमंत असा भेद त्याच्या ठायी नाही. असे असले तरी करोनाच्या दैनंदिन अहवालात हा विरोधाभास मात्र ठळकपणे उघड होत आहे. शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून एकाच दिवसात ७७५ रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. सध्या जवळपास चार हजार सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण वास्तव्यास असणारे ठिकाण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले जाते. अशी शहरात ५६६ क्षेत्र आहेत. यावरून रुग्ण कुठे वास्तव्यास आहे ते लक्षात येते. सध्याचे सर्व सक्रिय रुग्ण इमारतींमधील रहिवासी असल्याचे प्रतिबंधित  क्षेत्राच्या यादीवरून दिसते. करोनाचा फैलाव मध्यम, उच्च मध्यम वर्गात आधिक्याने होत असल्याचे महापालिकेचे निरीक्षण आहे. मध्यम, उच्च मध्यमवर्ग आधिक्याने शिक्षित मानला जातो. तरीदेखील नियमावलीचे हाच वर्ग मोठय़ा प्रमाणावर उल्लंघन करीत असल्याचे यातून प्रतीत होते. झोपडपट्टी किं वा दाट लोकवस्तीत सुरक्षित अंतर, मुखपट्टी वा अन्य नियमांचे बहुदा कटाक्षाने पालन होत असावे, असाही अहवालातून अर्थ निघतो.

हे वाचले का?  तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकमध्ये भक्तांची गर्दी

शहरातील करोनाबाधितांची संख्या ८५ हजारावर पोहचण्याच्या मार्गावर आहे. त्यातील जवळपास ८० हजार रुग्ण उपचाराअंती करोनामुक्त झाले. आजवर १०५७ जणांचा मृत्यू झाला. सुरूवातीला वडाळा, जुने नाशिक, भद्रकाली, फुलेनगर असा झोपडपट्टी, दाट लोकवस्तीचा भाग करोनाचा केंद्रबिंदू ठरला होता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तेथील रुग्ण कमी होऊन इमारती, बंगले वा अन्य निवासी भागात संख्या वाढली होती. तेव्हापासून मध्यम, उच्च मध्यम वर्गाच्या निवासी क्षेत्रात आजवर त्याचा मुक्काम कायम राहिलेला आहे. उलट आता तो अधिक वेगाने फैलावत आहे. मध्यंतरी खासगी प्रयोगशाळांच्या अहवालावरून बरेच वादंग झाले होते. या प्रयोगशाळांमध्ये चाचण्यांचे अहवाल सकारात्मक येण्याचे प्रमाण वाढल्यावर खुद्द प्रशासनाने आक्षेप घेतला होता. त्यावरून एका प्रयोगशाळेच्या चाचण्यांवर बंदी घालून इतरांवर कारवाईचे संकेत दिले गेले. परंतु, खासगी प्रयोगशाळेने आक्रमक भूमिका घेऊन आव्हान दिल्यानंतर तांत्रिक समितीच्या अहवालाच्या आधारे प्रशासनाला त्या प्रयोगशाळेला चाचणी, तपासणीचे काम करण्यास अनुमती द्यावी लागली. वाद संपुष्टात आले. याचा उपरोक्त विरोधाभासाशी संबंध नाही.

हे वाचले का?  इगतपुरीत सरासरी पावसात लक्षणीय घट, नाशिकमध्ये आतापर्यंत ७४८ मिलिमीटरची नोंद

सधन वर्गात आजाराच्या फैलावाचे मूळ शोधताना काही घटक वेगवेगळे मुद्दे उपस्थित करतात. झोपडपट्टीतील रहिवासी लक्षणे जाणवली तरी चाचणीला पुढे येत नसतील. मध्यम, उच्चमध्यम वर्ग जागरूक असतो. काही शंका वाटली तर लगेच तपासणी करून घेतली जाते. सधन भागात सातत्याने रुग्ण आढळण्याचे ते देखील एक कारण असू शकेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

शहरात गेल्या वर्षी एप्रिलच्या सुरुवातीला करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंत २० हजार ६०७ भाग प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून जाहीर झाली. सद्यस्थितीत ५६६ क्षेत्रे कार्यान्वित असून ती सर्व इमारतीतील असल्याचे पालिकेच्या अहवालात म्हटले आहे. सुक्ष्म प्रतिबंधित एकही क्षेत्र नाही. रुग्ण वास्तव्यास असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातून १४ दिवस कोणी बाहेर पडू नये आणि बाहेरील कोणी तिथे जाऊ नये, असा नियम आहे. परंतु, अनेक इमारतींमध्ये रुग्ण आढळू लागले. यावर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेकडे पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे या नियमांचे आसपासच्या रहिवाशांकडून पालन होत नाही. दिनक्रम बंद करणे वा थांबविणे कुणालाही शक्य नसल्याचे कारण पुढे केले जाते.

हे वाचले का?  पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा

सुरूवातीच्या काळातच झोपडपट्टी, दाट लोकवस्तीच्या भागात अनेकांना करोनाचा प्रादुर्भाव होऊन गेला. मागील काही महिन्यांपासून आणि सध्या जे काही सक्रिय रुग्ण आहेत, ते मुख्यत्वे झोपडपट्टी वगळता मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय वर्गातील असल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत महापालिका केवळ बाधिताचे निवासस्थान असणारी इमारत प्रतिबंधित करते. या भागात करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्राचा विस्तार करण्याचा विचार सुरू आहे.

– डॉ. बापूसाहेब नागरगोजे (आरोग्य अधिकारी, नाशिक महापालिका)