“सरकारचे येथे असे काही धंदे चालतात की…”; राज्यपालांची ठाकरे सरकारवर टीका

“महाराष्ट्र सरकार काय करतंय?”

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारवर टीका केली असून महाराष्ट्र सरकार काय करतंय अशी विचारणा केली आहे. तसंच काहीतरी गडबड आहे म्हणत पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतला नोकरी न देण्यासंदर्भात बोलताना त्यांनी ही टीका केली. नाशिकमध्ये आदिवासी सांस्कृतिक भवन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कविता राऊतदेखील या कार्यक्रमात उपस्थित होती.

“कविता राऊतला आपल्या गावात राहायचं असून सेवा करायची आहे. क्रीडामंत्री सुनील केदार यांनी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण अजून मिळालेली नाही. मंत्र्याने सांगूनही नोकरी मिळत नसेल तर काहीतरी गडबड आहे. पण मी कविताला सांगू इच्छितो की, थोडा वेळ लागेल पण नोकरी नक्की मिळेल. कारण सरकारचे येथे असे काही धंदे चालतात, काहीतरी अडचण आणत राहतात,” अशी टीका राज्यपालांनी यावेळी केली.

हे वाचले का?  CM Eknath Shinde : “उद्धव ठाकरेंनी आधी उरली सुरलेली शिवसेना…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका

“आदिवासी भागात शिक्षक मिळत नसतील तसंच शिक्षकांची भरती होत नसेल तर महाराष्ट्र सरकार काय करतंय?,” अशी विचारणादेखील यावेळी त्यांनी केली. राज्यपालांनी यावेळी आपण मुख्यमंत्री असताना शिक्षकांसाठी केलेल्या कामाची माहिती देताना राज्य सरकारशी चर्चा करु असं आश्वासन दिलं.

सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतला राज्य सरकारने वर्ग १ पदावर नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण अद्यापही नोकरी मिळालेली नाही. यासंबंधी कविता राऊतने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेटही घेतली होती.

हे वाचले का?  Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान