सहित्य संमेलनात कर्मकांड नको!

स्वागत आणि सल्लागार समितीच्या बैठकीत अपेक्षा

अनिकेत साठे

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास जागतिक ख्यातीचे शास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांच्या रूपाने प्रथमच विज्ञानव्रती संमेलनाध्यक्ष लाभल्याने नेहमीचे पूजन, श्रीफळ वाढवणे अशी तत्सम कर्मकांडे टाळून विचारांची देवाणघेवाण करणारे हे ऐतिहासिक संमेलन ठरावे, असाही विचार पुढे आला आहे. विज्ञानाधिष्ठित समाजनिर्मितीबरोबर पुरोगामित्वाच्या दिशेने वाटचाल करणारे हे संमेलन ठरावे, अशी अपेक्षा रविवारी येथे आयोजित बैठकीत मांडण्यात आली.

शहरातील गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात २६ ते २८ मार्च या कालावधीत होणाऱ्या संमेलनाची लगबग सुरू झाली आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत रविवारी स्वागत, सल्लागार समितीची पहिली बैठक झाली. या वेळी स्थानिक साहित्यिक संस्था, साहित्यप्रेमींनी संमेलन कसे असावे, कोणकोणते कार्यक्रम समाविष्ट करावेत, आदींविषयी विविध सूचना मांडल्या. नाशिकमध्ये होणारे हे तिसरे साहित्य संमेलन आहे. याआधी २००५ मध्ये ७८ वे साहित्य संमेलन येथे झाले होते. ते ‘बोकड बळी’ मुळे गाजले होते.

हे वाचले का?  Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, सिनेसृष्टीतील योगदानाबाबत गौरव

संमेलनाचे कार्य सिद्धीस जावे म्हणून मंडप उभारणीवेळी बोकडाचा बळी देण्यात आला होता. हा संदर्भ देत लेखक दत्ता पाटील यांनी या वेळी आपण एखाद्या बोकडाचा प्राण वाचवून मराठी साहित्य संमेलनास ऐतिहासिक पातळीवर नेण्याचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. संमेलनात प्रतीकांची पूजा करण्याची परंपरा आहे. पूजन, श्रीफळ वाढवणे नेहमीच केले जाते. यंदाच्या संमेलनात प्रथमच विज्ञानवादी साहित्यिक संमेलनाध्यक्ष लाभल्यामुळे कर्मकांडे टाळून थेट विचारांची देवाणघेवाण करणारे, आपल्याला पुरोगामित्वाकडे नेणारे हे संमेलन ठरावे, त्या दिशेने पहिले पाऊल टाकून नवीन पायंडा पाडूया, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

समाजात वैज्ञानिकदृष्टी निर्माण करण्यासाठी हे संमेलन उपयुक्त ठरावे, असे स्वागत समितीचे उपाध्यक्ष तथा गोखले शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांनी नमूद केले. तरुण पिढीला उद्योजकता आणि वैज्ञानिकतेची गरज आहे. डॉ. नारळीकर यांच्या मार्गदर्शनाचा तरुणाईला लाभ मिळवून द्यायला हवा असे त्यांनी सांगितले. खगोल अभ्यासक डॉ. गिरीश पिंपळे यांनी संमेलनात विज्ञान लेखनाशी संबंधित परिसंवादाचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. ग्रंथ प्रदर्शनात विज्ञान साहित्याचे वेगळे दालन असावे. यानिमित्ताने विज्ञान साहित्य मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात येईल असे ते म्हणाले.

हे वाचले का?  सांगलीत महापालिका शाळेत तब्बल ४० विद्यार्थ्यांना मारहाण, शिक्षिका निलंबित

संमेलन स्थळाचे ‘कुसुमाग्रज नगरी’ नामकरण

* गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होणाऱ्या संमेलन स्थळाचे ‘कुसुमाग्रज नगरी’ असे नामकरण करण्यात आल्याचे स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी जाहीर केले. येथे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे १९२७ ते १९३० या कालावधीत शिक्षण झाले होते.

* दरम्यान, संमेलनाचे संपूर्ण शहरात प्रतिबिंब उमटावे म्हणून नाशिककरांनी आपल्या घरावर सन्मानाची आणि साहित्याची गुढी उभारावी, असे आवाहन भुजबळ यांनी केले. खुष्कीच्या मार्गाने राजकीय मंडळी संमेलनाच्या व्यासपीठावर आल्याचा आक्षेप घेतला जात असला तरी राजकीय मंडळींचा व्यासपीठ व्यापण्याचा कोणताही इरादा नसल्याचे त्यांनी नमूद केले.

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!

कर्मकांड मीही मानत नाही. संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रातिनिधिक स्वरूपात दीप प्रज्वलन वा तत्सम एखादा कार्यक्रम करावा लागेल. बैठकीत विविध स्वरूपांच्या सूचना प्राप्त झाल्या असून संबंधित समिती त्यावर विचारविनिमय करून निर्णय घेईल. कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा अद्याप निश्चित झालेली नाही.

– छगन भुजबळ,स्वागताध्यक्ष, ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन