सांडपाण्यामुळे गोदावरीत शेवाळयुक्त पाणी; विभागीय आयुक्तांनी हस्तक्षेप करण्याची मागणी

प्रक्रिया न करताच सांडपाणी थेट गोदापात्रात मिसळत असल्याची बाब रामकुंड परिसरात साचलेल्या शेवाळयुक्त पाण्याने उघड झाल्याची तक्रार गोदावरी प्रदूषणाच्या मुद्यावर याचिका दाखल करणारे राजेश पंडित यांनी केली आहे.

नाशिक : प्रक्रिया न करताच सांडपाणी थेट गोदापात्रात मिसळत असल्याची बाब रामकुंड परिसरात साचलेल्या शेवाळयुक्त पाण्याने उघड झाल्याची तक्रार गोदावरी प्रदूषणाच्या मुद्यावर याचिका दाखल करणारे राजेश पंडित यांनी केली आहे. गोदावरीचे पावित्र्य जपण्यासाठी विभागीय आयुक्तांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा विषय कित्येक वर्षांपासून गाजत आहे. अनेक ठिकाणी प्रक्रिया न करता गटारीचे पाणी थेट नदीपात्रात जात असल्याच्या तक्रारी वारंवार होतात. गोदावरीला प्रदूषणाच्या जोखडातून सोडविण्यासाठी दाखल याचिकेत उच्च न्यायालयाने उपाय योजनांबाबत विविध निर्देश दिले आहेत. महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस आदी विभागांची जबाबदारी निश्चित केलेली आहे.
संबंधितांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे. या प्रक्रिया पार पडूनही उन्हाळय़ात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर गोदावरी प्रदूषणाची स्थिती समोर येत आहे.
रामकुंड वा नदी काठावर अन्यत्र फेरफटका मारताना साचलेल्या पाण्यातून अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरल्याचे लक्षात येते. उन्हाळय़ामुळे सध्या गोदावरी प्रवाही नाही. इतरवेळी म्हणजे वाहत्या पाण्यात ही बाब लक्षात येत नाही. प्रदुषणामागील कारणमिमांसा याचिकाकर्ते पंडित यांनी केली.
रामकुंड परिसरात अनेक ठिकाणी शेवाळयुक्त पाणी दिसून येते. सांडपाणी पात्रात मिसळत असल्याचे शेवाळ निर्मितीवरून सिध्द होत असल्याची बाब त्यांनी विभागीय आयुक्तांसमोर मांडली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने हस्तक्षेपाची गरज आहे. या स्थितीचे प्रत्यक्ष अवलोकन करण्यासाठी समितीने स्थळ पाहणी करावी, असा आग्रह त्यांनी धरला आहे.

हे वाचले का?  नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या सुंदरतेसाठी स्थानिक वास्तूविशारदांचे सहाय्य