सातारा : कास पठारावर एक लाख पर्यटक तर दीड कोटींचा महसूल…

मागीलवर्षी पन्नास हजारांच्या आसपास पर्यटकांनी कासला भेट दिली होती, यातून ७५ लाखांच्या आसपास महसूल जमा झाला होता.

वाई : कास पठारावर यावेळी निसर्गकृपा चांगलीच झाली. मागीलवर्षी पेक्षा दुप्पट फुलांबरोबरच एक लाख पर्यटक आणि दीड कोटींचा महसूल मिळवत स्थानिकांच्या अर्थचक्राला मोठा हातभार लावला. यावेळी पर्यटकांचा ही चांगला बहर पाहावयास मिळाला. यावर्षी तीन सप्टेंबर ला अधिकृत हंगाम सुरू झाला. ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने पर्यटकांना प्रवेश देण्यात आला. यावर्षी सप्टेंबर नंतरच फुले चांगली बहरल्याने ऑनलाईन ची तीन हजार तिकीट विकेंड ला क्षणात संपत होती. तिकीट न मिळाल्याने अनेक जण थेट येत असल्याने शनिवार रविवार प्रचंड गर्दी होऊन वाहतूक कोंडीही झाली.

हे वाचले का?  अलिबागच्या नाट्यगृहासाठी ९ कोटी ३२ लाखांचा निधी

यावर्षी पठारावरील कुंपण हटवल्याने पठारावर वेगवेगळ्या प्रजाती चांगल्या प्रकारे बहरल्या होत्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात येणारी गेंद, तेरडा, सितेची आसवे, सोणकी, मिकी माऊस, चवर यांचे गालिचे पाहावयास मिळाले. टोपली कारवी ही यावर्षी बहरल्याचे पाहावयास मिळाले. अनेक दुर्मिळ प्रदेशनिष्ठ फुले कासवर येतात. यावर्षी यातील किटकभक्षी ड्राॅसेरा इंडिका, बर्मानी, कंदीलपुष्प, आभाळी, नभाळी, आमरी, सातारेन्सीस, टूथब्रश अशी फुले ही चांगली होती.

मागीलवर्षी पन्नास हजारांच्या आसपास पर्यटकांनी कासला भेट दिली होती, यातून ७५ लाखांच्या आसपास महसूल जमा झाला होता. पण यावर्षी पर्यटकांची संख्या दुप्पट होण्याबरोबरच महसूल ही दीड कोटींच्या पुढे गेला. हंगाम तीन सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर या कालावधीत फक्त सव्वा महिनेच चालला. यामध्ये शनिवार रविवार प्रचंड गर्दी होवून पर्यटकांची गैरसोय झाली. ऑक्टोबर मध्ये पावसाने ओढ दिल्याने फुलांनी लवकर निरोप घेतला. दोन महिने चालणार हंगाम सव्वा महिनेच चालल्याने शेवटच्या टप्प्यात येणारांची निराशा झाली तर अनेकांना हंगाम लवकर संपल्याने येता आले नाही. स्थानिक व्यावसायिकांना हंगाम कालावधी कमी झाल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

हे वाचले का?  Priyanka Gandhi Vadra Net Worth : आठ लाखांची होंडा सीआरव्ही, सोनं-चांदी अन्…; प्रियांका गांधी वाड्रा यांची एकूण संपत्ती किती?

“कासचा हंगाम चांगला गेला असून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कासचे पर्यटन बारमाही होण्यासाठी परिसरातील नैसर्गिक स्थळांची पाहणी करून नवीन पाॅइंट विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहू”, असे कास समितीचे माजी अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी म्हटले आहे.