साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम

उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या वतीने निवडणूक लढवावी, असा प्रस्तावही पक्षाच्या वतीने देण्यात आला होता.

मुंबई : राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सतत निवडून येणारी साताऱ्याची जागा महायुतीत भाजपने राष्ट्रवादीकडून बळकावली आहे. भाजपने साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली. साताऱ्याचा प्रश्न सुटला असला तरी महायुतीत ठाणे, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर या जागांवरील तिढा अद्यापही कायम आहे.

सातारा मतदारसंघात १९९९ पासून एकत्रित राष्ट्रवादीने विजय मिळविला होता. यामुळेच महायुतीतील जागावाटपात ही जागा मिळावी, अशी अजित पवार यांची मागणी होती. साताऱ्याच्या जागेवर आमचाच दावा असल्याचे प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे सतत सांगत होते.

हे वाचले का?  “पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!

उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या वतीने निवडणूक लढवावी, असा प्रस्तावही पक्षाच्या वतीने देण्यात आला होता. भाजपने साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडून अक्षरक्ष: बळकावली आहे. भाजप उमेदवारांच्या १२व्या यादीत साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीने दावा करूनही भाजपने ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली. २५ वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली ही जागा भाजपने स्वत:कडे घेतली आहे. अजित पवार यांना भाजपची दादागिरी निमूटपणे सहन करण्याशिवाय पर्याय नाही. महायुतीत गेल्या वेळी जिंकलेल्या जागा राष्ट्रवादी लढवेल, असे अजित पवार यांनी मागे जाहीर केले होते. पण चारपैकी एक जागा राष्ट्रवादीच्या ताब्यातून निसटली आहे. 

हे वाचले का?  नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले

चार मतदारसंघात अद्याप वाद

सातारा मतदारसंघ भाजपने स्वत:साठी घेतला. ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, पालघर या मतदारसंघांचा तिढा  सुटू शकलेला नाही.  ठाण्याच्या जागेवर भाजपने दावा केला असला तरी मुख्यमंत्री शिंदे ठाणे सोडण्यास  तयार नाहीत. नाशिकच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि शिंदे गटात जुंपली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच  आहे. नारायण राणे यांनी प्रचाराला सुरुवात केली असली तरी उद्योगमंत्री उदय सामंत हे माघार घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. पालघरच्या जागेवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये सहमती होऊ शकलेली नाही. सोलापूर आणि माढा मतदारसंघात भाजपचे उमेदवार  राम सातपुते आणि खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सोलापूरात अर्ज दाखल केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

हे वाचले का?  पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शन रांगेसाठी ‘ स्कायवॉक ‘, १२९ कोटी खर्चाच्या आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मान्यता