सात महिन्यांनंतर शहर बस रस्त्यावर

उत्पन्न लक्षात घेऊन संख्या वाढविण्याची तयारी

आजपासून सहा मार्गावर धावणार; उत्पन्न लक्षात घेऊन संख्या वाढविण्याची तयारी

नाशिक : करोनाच्या टाळेबंदीत तब्बल सात महिने थांबलेली शहर बससेवेची चाके गुरुवारपासून पुन्हा एकदा गतिमान होणार आहेत. शहरातील मुख्य सहा मार्गावर दैनंदिन प्रत्येकी २० फेऱ्या मारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मार्गावरील उत्पन्न लक्षात घेऊन बसगाडय़ांची संख्या वाढविण्याचे संकेत एसटी महामंडळाने दिले आहेत.

टाळेबंदीचे निर्बंध शिथिल होत असताना दैनंदिन व्यवहार पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. करोनामुळे सामान्य नागरिक, नोकरदार, व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. वैयक्तिक वाहन नसणाऱ्यांना एसटी महामंडळाच्या शहर बससेवेचा मुख्य आधार असतो. तथापि, एसटी महामंडळ निर्बंध शिथिल होऊनही सेवा सुरू करण्यास उत्सुक नव्हते. महापालिकेने शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यापासून म्हणजे दोन वर्षांपासून एसटी महामंडळाने टप्प्याटप्प्याने शहरातील सेवा कमी केली. कधीकाळी २०० बसगाडय़ा वापरात असलेल्या शहरातील बससंख्या टाळेबंदीआधी १२० बसपर्यंत कमी करण्यात आली होती. करोनाच्या संकटात २२ मार्च रोजी रात्रीपासून बंद झालेली शहर बससेवा २२ ऑक्टोबर अर्थात सात महिन्यांनंतर पुन्हा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जात असल्याचे विभागीय नियंत्रक नितीन मैंद यांनी सांगितले. अर्थात ही सेवा विशिष्ट मर्यादेत राहील. पहिल्या दिवशी १५ ते २० बसच्या आधारे सहा मार्गावर प्रत्येकी २० फे ऱ्या मारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यातून मिळणारे उत्पन्न लक्षात घेऊन बस आणि फे ऱ्यांची संख्या वाढविली जाईल, असे मैद यांनी नमूद केले.

हे वाचले का?  नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या सुंदरतेसाठी स्थानिक वास्तूविशारदांचे सहाय्य

महामंडळाने नागरिकांना वेठीस न धरता सेवा सुरू करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी केली होती. करोनाकाळात खासगी वाहने बंद असताना एसटी महामंडळाला उत्पन्नवाढीची चांगली संधी होती.

संपूर्ण राज्यात बससेवा सुरू झाली, परंतु शहरात बससेवा सुरू झाली नाही. उलट बससेवा सुरू करण्यासाठी तोटा आणि अन्य कारणे देणाऱ्या महामंडळाने बेस्टच्या मदतीला धाव घेतल्याचा आक्षेप त्यांनी नोंदविला होता. नाशिकमधील सर्वसामान्य प्रवाशांवर अन्याय कशासाठी, असा प्रश्न करत महामंडळाने तातडीने बससेवा सुरू करण्याची मागणी पाटील यांनी केली होती. या घटनाक्रमानंतर महामंडळाने काही विशिष्ट मार्गावर का होईना सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे.

हे वाचले का?  नाशिक, नगरमधून जायकवाडीसाठी ५५ टीएमसीहून अधिक पाणी; पाणी वाटप संघर्ष टळला

अनेक भाग सेवेपासून वंचितच

एसटी महामंडळ शहरात काही निवडक मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर सेवा सुरू करीत असले तरी अनेक भाग या सेवेपासून वंचित राहणार असल्याचे लक्षात येते. गंगापूर, आडगाव, म्हसरूळ, मखलमाबाद हा शहराचा निम्मा भाग शहर बससेवेत समाविष्ट करण्यात आलेला नाही. मुळात सर्वच भागांत रोजंदारी तसेच लहानसहान कामे करून गुजराण करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना निर्बंध शिथिल झाल्यानंतर एक तर पायपीट करणे वा महागडी रिक्षा सेवा हे पर्याय होते. संबंधितांकडून आकारले जाणारे भाडे आणि एसटी महामंडळाचे भाडे यात तफावत आहे. त्यामुळे सर्व भागांतील घटकांना दिलासा देण्यासाठी बससेवेचा परिघ विस्तारण्याची गरज आहे.

हे वाचले का?  Jayakwadi Dam: जायकवाडीसाठी नाशिकमधून आतापर्यंत १७ टीएमसी पाणी, धरणांतील विसर्ग मंदावला

आजपासून या मार्गावर धावणार बस

*   निमाणी ते नाशिकरोड

*   निमाणी ते श्रमिकनगर

*   निमाणी ते उत्तमनगर

*   निमाणी ते अंबड

*   निमाणी ते विजयनगर

*   निमाणी ते पाथर्डी गाव