साहित्य संमेलनाच्या ३९ समित्यांमध्ये तब्बल ६४४ सदस्य

संमेलनाच्या तयारीसाठी अन्यत्र मिळणारा कालावधी आणि नाशिकला मिळालेला कालावधी यामध्ये मोठे अंतर आहे.

समिती प्रमुख, उपप्रमुखांमुळे अधिकार आणि जबाबदारीचे विकेंद्रीकरण

नाशिक : मार्च महिन्यात येथे होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जाहीर झालेल्या विविध ३९ समित्या, समिती प्रमुख, उपप्रमुखांची नियुक्ती झाल्यामुळे प्रत्यक्ष आकारास आल्या आहेत. या सर्व समित्यांमध्ये तब्बल ६४४ सदस्य आहेत. संमेलनाची तारीख निश्चित झाल्यापासून लोकहितवादी मंडळाच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांना धावपळ करावी लागत होती. निर्णय घेण्याबरोबर महत्त्वाच्या कामांची जबाबदारी त्यांच्या शिरावर होती. यानिमित्ताने अधिकारांसह जबाबदारीचे विकेंद्रीकरण झाले आहे.

संमेलनाच्या तयारीसाठी अन्यत्र मिळणारा कालावधी आणि नाशिकला मिळालेला कालावधी यामध्ये मोठे अंतर आहे. करोनाकाळात आयोजित करावयाच्या संमेलनास आता केवळ ४३ दिवस शिल्लक आहेत. अल्प काळात दिमाखदारपणे नियोजन करण्याच्या मुद्द्यावर याआधीच्या बैठकांमध्ये चर्चा होऊन ३९ समित्या स्थापन करण्याचे जाहीर झाले होते. समित्यांची घोषणा झाली असली तरी त्यातील पदाधिकारी, सदस्य यांची नावे निश्चित करण्यात बराच कालावधी गेला. समित्यांना मुहूर्त लाभत नसल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता होती.

हे वाचले का?  मतदारांना प्रलोभन देणाऱ्या विरोधात मालेगावात कारवाई

सर्व समित्यांमध्ये समन्वयाची जबाबदारी सांभाळणारे विश्वास ठाकूर यांनी ३९ समित्यांचे प्रमुख, उपप्रमुखांची नावे जाहीर केली. यामध्ये अनेक अमराठी नावे दिसत आहेत. प्रत्येक समितीवर लोकहितवादी मंडळाच्या सदस्यांना पालक पदाधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. ध्वनी, प्रकाशयंत्रणा समितीत केवळ सहा सदस्य असून सर्वाधिक ५७ सदस्य बालकुमार मेळावा समितीत आहेत. स्वागत समितीत ३७, पदाधिकारी-कार्यकारिणी समन्वय १०, उद््घाटन-समारोप समितीत १३, सांस्कृतिक कार्यक्रम १३, सभा मंडप (व्यासपीठ, सजावट, बैठक व्यवस्था) १५, परिवहन (वाहतूक) समितीत १२, ग्रंथ प्रदर्शन-अन्य प्रदर्शने समितीत २३, आपत्कालीन नियोजन समितीत नऊ ग्रंथदिंडी समितीत ३५ सदस्यांचा समावेश आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतरही अनेकांनी विविध स्वरूपांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे.

हे वाचले का?  तेल, डाळ, पिठाच्या दरवाढीने बहिणींना दिवाळी महाग, जितेंद्र आव्हाड यांची महायुतीवर टीका

काही समित्यांबाबत संभ्रम

काही समित्यांमध्ये जे प्रमुखपदी नियुक्त झाले, त्यांच्या त्या विषयाशी दूरान्वये संबंध नसल्याचे लक्षात येते. मोठ्या संख्येने असणाऱ्या समिती आणि तितकीच मोठी इच्छुकांची संख्या यामुळे तसे घडले असण्याची शक्यता आहे. परिवहन (वाहतूक) व्यवस्था समितीच्या प्र्रमुखपदी महिला डॉक्टरची नेमणूक करण्यात आली. त्यांचा परिवहन, वाहतूक व्यवस्थेशी कसा संबंध येईल याचे आकलन होत नाही. वैद्यकीय मदत समितीची जबाबदारी डॉक्टरांकडे असणे अभिप्रेत होते. त्या समितीची धुरा भलत्याच व्यक्तीवर सोपविली गेली.

महिलांना अल्प प्रतिनिधित्व

मध्यंतरी स्वागताध्यक्ष भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच बैठकीत प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांनी नियोजनात महिलांची उपस्थिती कमी असल्याचा मुद्दा मांडला होता. मोठ्या संख्येने स्थापन झालेल्या समित्यांमध्ये महिलांना पुरुषांच्या तुलनेत अल्प प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाल्याचे दिसून येते. ३९ पैकी केवळ पाच समित्यांचे प्रमुखपद महिलांना देण्यात आले आहे. यामध्ये स्वागत समिती (नियोजन) विजयालक्ष्मी मणेरीकर, सत्कार समिती अनघा धोडपकर, सभा मंडप समिती मंजुश्री राठी, परिवहन (वाहतूक) समिती डॉ. श्रिया कुलकर्णी यांचा समावेश आहे.

हे वाचले का?  नाशिक: पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेसला विलंब, रेल्वेला नोटीस