साहित्य संमेलनात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल

संमेलन स्थळाचे नामकरण कविवर्य कुसुमाग्रज नगरी असे  करण्यात आले आहे.

परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश 

नाशिक : भुजबळ नॉलेज सिटी परिसरात लोकहितवादी मंडळ, अखिल भारतीय साहित्य महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत  ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनात सांस्कृतिक, साहित्यिक, वैचारिक अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.

संमेलन स्थळाचे नामकरण कविवर्य कुसुमाग्रज नगरी असे  करण्यात आले आहे. संमेलनास अध्यक्ष म्हणून प्रसिध्द खगोलशास्त्रज्ञ तथा  लेखक डॉ. जयंत नारळीकर आणि स्वागताध्यक्ष म्हणून पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. दोन डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून चार तारखेला सायंकाळी स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम तसेच संमेलन समारोपाच्या दिवशी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.  तीन तारखेला सकाळी साडेआठ वाजता कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानपासून ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून  शहर परिसरात फिरून संमेलनस्थळी समारोप होणार आहे. सकाळी अकरा वाजता महामंडळ पदाधिकारी, स्वागत समिती सदस्य तसेच निमंत्रित साहित्यिक यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन होणार आहे. दुपारी चार वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार असून त्यानंतर संमेलनाचा उदघाटन सोहळा होणार आहे. रात्री नऊ वाजता निमंत्रितांचे काव्यसंमेलन होणार आहे. 

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यात ६.५२ टक्क्यांनी वाढ – ६९.१२ टक्के मतदान, मतटक्का वाढीत महिलांचा लक्षणीय हातभार

चार तारखेला ज्येष्ठ प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत होणार असून डॉ. चंद्रकांत पाटील, दिलीप माजगावकर भटकळ यांच्याशी संवाद साधणार आहेत. नाशिकचे ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे आणि ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलाजपूरकर यांचा सत्कार संमेलनाध्यक्षांच्या हस्ते होणार

आहे.

याच दिवशी ‘संवाद लक्षवेधी कवींशी’ हा कार्यक्रम होणार आहे. ‘स्मृतीचित्रे-लक्ष्मीबाई टिळक’ या विषयावर होणाऱ्या परिसंवादात प्रा. एकनाथ पगार, सुहास जोशी, रेखा इनामदार, डॉ. गजानन जाधव, डॉ. मोना चिमोटे सहभागी होणार आहेत. ‘करोना नंतरचे अर्थकारण आणि मराठी साहित्य व्यवहार’, ‘मराठी नाटक – एक पाऊल पुढे, दोन पाऊल मागे’, ‘शेतकऱ्यांची दु:स्थिती, आंदोलने, राजसत्तेचा निर्दयपणा, लेखक कलावंताचे मौन आणि सेलिब्रिटींची भूमिका’, ‘साहित्य निर्मितीच्या कार्यशाळा- गरज की थोतांड’, ‘गोदातटीच्या संतांचे योगदान’   ‘नाशिक जिल्ह्याची वाटचाल, विकास व संकल्प’ अशा विविध विषयांवरील परिसंवादही संमेलनात होणार आहेत. 

हे वाचले का?  मोदी यांच्या सभेस चार उमेदवार अनुपस्थित; देवळालीतील सरोज अहिरे व्यासपीठावर, शिंदे गटाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

बाल साहित्यिक मेळावा

साहित्य संमेलनात ४ डिसेंबर रोजी ‘बाल साहित्यिक मेळावा’ होणार असून याचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते व लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनस्थळी नाशिकचे शिल्पकार, चित्रकार आदी कलाकारांचे चित्रप्रदर्शन, नाशिकच्या लेखकांचे पुस्तक प्रदर्शनही असणार आहे.