साहित्य संमेलन अनिश्चिाततेच्या गर्तेत

करोनामुळे गेल्या मार्चमध्ये होणारे संमेलन स्थगित करून पुढील काळात घेण्याचे निश्चित झाले होते.

सप्टेंबरपर्यंत आयोजन पुढे ढकलण्याचा निमंत्रकांचा प्रयत्न
नाशिक : करोनाच्या संकटामुळे स्थगित झालेल्या येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने प्रश्नांची सरबत्ती करीत आणखी दीड महिना प्रतीक्षा करायची की हे संमेलन रद्द करायचे, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. महामंडळाने ताठर भूमिका घेतली असली तरी नैसर्गिक आपत्ती आणि करोना संकटामुळे तूर्तास नाशिकच काय, कुठेही संमेलनाचे आयोजन करता येणार नसल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. संमेलनाची बहुतांश तयारी झालेली आहे. एक ते दोन हजार लोक एकत्र येतील, अशा कार्यक्रमास परवानगी मिळणार नाही. त्यामुळे संमेलनाचा मुहूर्त सप्टेंबरपर्यंत लांबविण्याचा निमंत्रक संस्थेचा प्रयत्न आहे.

करोनामुळे गेल्या मार्चमध्ये होणारे संमेलन स्थगित करून पुढील काळात घेण्याचे निश्चित झाले होते. करोनाची स्थिती नियंत्रणात आलेली नसल्यामुळे नवीन तारखा निश्चित करता आलेल्या नाहीत. या काळात साहित्य महामंडळ आणि निमंत्रक संस्था असलेल्या लोकहितवादी मंडळ यांच्यामध्ये विसंवाद झाले. आयोजनातील न रुचलेल्या बाबींवर महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी आक्षेप नोंदविले होते. तेव्हाच पुढील काळात संमेलन होण्याची शक्यता धूसर बनली. महामंडळाने  निमंत्रक संस्थेला पाठविलेल्या खरमरीत पत्रातून तेच संकेत मिळत आहेत. स्थगित केलेले संमेलन जूनअखेरपर्यंत घेता येईल असा अंदाज होता. पण, करोनाने तो खोटा ठरवला. करोनाची परिस्थिती नाशिकला संमेलन घेता येईल अशी आहे का, महाराष्ट्र शासन-जिल्हा प्रशासन संमेलन घेऊ देण्यास अनुकूल प्रतिसाद देईल का, निमंत्रक संस्था, स्वागत मंडळाची सर्व अडचणींवर मात करून संमेलन घेण्याची तयारी आहे का,  तयारी असेल तर ते कधीपर्यंत घेतले जाईल, वर्ष उलटून गेल्यामुळे शासनाने अनुदान नाकारले तर संमेलनास आवश्यक निधी जमा होईल का, असे नानाविध प्रश्न महामंडळाने उपस्थित केले आहेत. लोकहितवादी मंडळ आणि स्वागत मंडळाची भूमिका जाणून संमेलन दीड महिना स्थगित करायचे की तूर्त या वर्षी नाशिकपुरते साहित्य संमेलन रद्द करायचे तसेच झालेली प्रक्रिया रद्द करून सर्वांना मुक्त करायचे, यासंबंधीचा निर्णय महामंडळास घेता येईल, असे महामंडळाने नमूद के ले आहे.

हे वाचले का?  सैन्य भरतीसाठी देवळाली कॅम्प येथे एकाच दिवसात १२ हजार तरुण उपस्थित

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, नाशिकच काय, कुठेही संमेलनाचे आयोजन करता येणार नाही. साहित्य महामंडळाच्या अपेक्षेनुसार संमेलनाच्या आयोजनाची आमची तयारी आहे. संमेलनात हजार, दोन हजार लोक एकत्र येतील. सरकार त्यास परवानगी देणार नाही. – छगन भुजबळ (स्वागताध्यक्ष, ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक)

पुढील दीड महिन्यात करोना स्थिती, शासन नियम काय असतील, याचा अंदाज बांधता येणार नाही. पावसामुळे सप्टेंबरपर्यंत संमेलनाचा विचार होऊ शकत नाही. सध्या करोनाच्या नियमावलीत ५० जणांची बैठक घेण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे स्वागत समितीची बैठक घेता येत नाही. परिस्थिती सुधारल्यास महिनाभरात संमेलन उभे करून यशस्वी करण्याची आमची तयारी आहे. शासकीय मदत मिळाली नाही तरी लोकवर्गणीतून निधी जमविला जाईल.

हे वाचले का?  द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या महिलेस दिल्लीत अटक

-जयप्रकाश जातेगांवकर (अध्यक्ष, लोकहितवादी मंडळ, नाशिक)

सरकारी अनुदानाची चिंता

यापूर्वी ठाले पाटील यांनी संमेलनाच्या कोटीच्या कोटी उड्डाणावर आक्षेप घेतले होते. आमदारांच्या निधीतून देऊ केलेले पैसे याला लोकवर्गणी म्हणता येत नाही. दीड कोटी रुपयात उत्तम संमेलन होऊ शकते, याकडे लक्ष वेधले होते. तथापि, आता त्यांनाही आर्थिक वर्ष उलटून गेल्यानंतर संमेलनास मिळणारे सरकारचे अनुदान मिळेल की नाही, याची चिंता असल्याचे पत्रातून दिसत आहे.

हे वाचले का?  गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध – दुपारी तीन ते रात्री १२ वेळेत प्रवेश बंद

Sharehttps://d-22963338141870525618.ampproject.net/2107092322000/frame.htmlREAD IN APP