सीबीआयची मुंबईसह गाझीयाबाद व हिमाचल प्रदेशात शोध मोहीम; ८० कोटी रुपयांच्या फसणुकीप्रकरणी गुन्हा दाखल

२००९ ते २०२१ या कालावधी हा गैरव्यवहार झाला असून त्याबाबत एसबीआयने सीबीआयकडे तक्रार केल्यानंतर नुकताच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) नेतृत्वाखालील बँकांच्या संघाचे ८० कोटी ७३ लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नुकताच दहिसर येथील ॲल्युमिनियम फॉइलची निर्मिती करणारी कंपनी, तिचे संचालक आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मुंबईसह गाझियाबाद, हिमाचल प्रदेश येथे सीबीआयने शोध मोहीम राबवली.

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!

या कंपनीने कर्ज मिळवण्यासाठी आर्थिक नोंदी असलेल्या कागदपत्रांमध्ये बदल करून सादर केले. त्याद्वारे मिळालेली कर्जाची रक्कम इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. २००९ ते २०२१ या कालावधी हा गैरव्यवहार झाला असून त्याबाबत एसबीआयने सीबीआयकडे तक्रार केल्यानंतर नुकताच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मे. पार्थ फॉईल, कंपनीचे संचालक पार्थो विजोय दत्ता व अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तक्रारीनुसार, कंपनीची कर्जाची खाती २०२१ मध्ये बुडीत घोषित करण्यात आली होती. त्याबाबत करण्यात आलेल्या तपासणीत कर्ज मिळवण्यासाठी कर्जदार कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांनी फेरफार केलेले स्टॉक बुक, स्टेटमेंट सादर करण्यात आले. तसेच कर्जाची रक्कम इतरत्र वळण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी सीबीआयकडे तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने मुंबई, गाझियाबाद आणि हिमाचल प्रदेशातील बद्दी यासह अनेक ठिकाणी शोध मोहीम राबविली. त्यात संशयीत कागदपत्रे, हार्ड डिस्क, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी जप्त करण्यात आल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले.