सुवर्णनगरीला संघर्षांचा फटका ; जळगावमध्ये दरांत चढ-उतार

सुवर्णनगरीत सोमवारी सकाळी प्रतितोळा एक हजार ३५० रुपयांनी, तर चांदी प्रतिकिलो दोन हजार ६० रुपयांनी स्वस्त झाली

जळगाव :  आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध घडामोडींसह रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम होऊन सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. गेल्या आठवडय़ात सोन्याचे दर वधारले होते. आता आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. सुवर्णनगरीत सोमवारी सकाळी प्रतितोळा एक हजार ३५० रुपयांनी, तर चांदी प्रतिकिलो दोन हजार ६० रुपयांनी स्वस्त झाली. रशिया-युक्रेन यांच्यातील युध्द अधिक दिवस सुरू राहिल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल. सोन्याचे दर प्रतितोळा ६० हजारांची पातळी गाठू शकतात, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

हे वाचले का?  निवडणुकीसाठी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

गेल्या आठवडय़ात रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे सोन्याचे दर वाढले. रशिया-युक्रेन संघर्षांचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या खरेदी-विक्रीवर दिसून आला. गेले काही दिवस सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने उसळी दिसून आली. सुवर्णनगरीत सोमवारी २४ कॅरेट सोने प्रतितोळा ५१ हजार ४०० रुपये तर चांदी प्रतिकिलो ६५ हजार ५२० रुपये असे दर होते

स्थानिक सराफ बाजारात सलग तीन दिवस सोने महागले. या काळात सोने दीड हजार तर, चांदी अडीच हजारांनी महागली. गेल्या आठवडय़ात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झाली. त्यामुळे सोने दराने ५२ हजारांचा टप्पा पार केला होता. आता आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी दरात घसरण झाली आहे.

हे वाचले का?  Sanjay Raut : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय? संजय राऊत म्हणाले, “आमचं ठरलंय जो..”

सोने म्हणजे सुरक्षित गुंतवणूक

रशिया आणि युक्रेनमधील संकटाचा थेट परिणाम सोन्याच्या खरेदी-विक्रीवर दिसून येत आहे. युद्धजन्य स्थितीत गुंतवणूकदारांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग म्हणून सोन्याला पसंती दिली जाते. त्यामुळे सोन्याच्या मागणीत चांगलीच वाढ झाली. दराने ५२ हजारांचा टप्पा पार केला. २४ कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर ५२ हजार ७५० रुपये, तर चांदीचा प्रतिकिलो दर  ६७ हजार ५८० रुपयापर्यंत गेला. सोमवारी ते काहीसे कमी झाले. 

गेल्या आठवडय़ापासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू राहिले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे दरात वाढ झाली आहे. गुरुवारी रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले. हा तणाव वाढल्यास आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल. – मनोहर पाटील (व्यवस्थापक, आर. सी. बाफना ज्वेलर्स, जळगाव)

हे वाचले का?  Raj Thackeray on Badlapur Case: बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य; कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले, “त्या मुलींना आणि घरच्यांना…”