स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांची अडवणूक

अल्पशिक्षित, वृद्ध ग्राहकांची अवहेलना

अल्पशिक्षित, वृद्ध ग्राहकांची अवहेलना

पारनेर : स्टेट बँकेच्या पारनेर शाखेतील रोखपालासह इतर कर्मचाऱ्यांकडून अल्पशिक्षित, वृध्द ग्राहकांची मोठय़ा प्रमाणावर अडवणूक करण्यात येत आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे ग्राहकांना मनस्ताप सोसावा लागत आहे.

रोख रक्कम जमा करण्यासाठी अथवा खात्यातून काढण्यासाठी किमान रकमेचे कोणतेही बंधन नसताना येथील स्टेट बँकेच्या शाखेत रक्कम जमा करणे अथवा खात्यातून रक्कम काढण्यासाठी, वीस हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम नाकारण्यात येते. बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात पैसे जमा करण्यासाठी अथवा खात्यातून पैसे काढण्यासाठी पाठवण्यात येते. बँकेत रक्कम जमा करण्यासाठी अथवा काढण्यासाठी किमान रकमेचे बंधन नाही. व्यवहार बँकेत करायचे किंवा ग्राहकसेवा केंद्रात करायचे हे ग्राहकांसाठी ऐच्छिक आहे. असे असतानाही केवळ काम टाळण्यासाठी बँकेचे रोखापाल भूषण गहूकर ग्राहकांना ग्राहक सेवा केंद्रात पाठवतात अशी ग्राहकांची तक्रार आहे.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यात ६.५२ टक्क्यांनी वाढ – ६९.१२ टक्के मतदान, मतटक्का वाढीत महिलांचा लक्षणीय हातभार

ग्राहकसेवा केंद्र स्टेट बँकेच्या समोरच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर आहे. पहिल्या मजल्यावर जीना चढून जाणे वयोवृद्ध ग्राहकांना त्रासदायक ठरते याबाबत तक्रार केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.अवमानास्पद वागणूक दिली जाते. तसेच ग्राहक सेवा केंद्रात जमा करण्यात आलेली रक्कम मोठय़ा विलंबाने संबंधित ग्राहकाच्या खात्यात जमा केली जाते. सेवा केंद्रात रक्कम जमा केल्यानंतर ग्राहकाला पावती दिली जात नाही. त्यामुळे खात्यात रक्कम जमा होईपर्यंत ग्राहकांना मनस्ताप सोसावा लागतो.अशा विविध तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येत आहेत. स्टेट बँकेच्या विभागीय कार्यालयाने ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्याची मागणी होत आहे. दरम्यान स्टेट बँकेच्या नाशिक विभागीय कार्यालयातील संबंधित अधिकारी निकम यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हे वाचले का?  ‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत

मी गुरुवारी दुपारी  दहा हजार रुपये जमा करण्यासाठी बँकेत गेलो होतो. माझ्यापुढे सहा ग्राहक होते. अत्यंत संथ गतीने कामकाज सुरू होते. दीड तास रांगेत थांबल्यानंतर रोखापाल भूषण गहूकर यांनी रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. वीस हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम स्वीकारण्यात येणार नसल्याबद्दल कोणत्याही सूचना बँकेत अथवा बँकेच्या दर्शनी भागात लावण्यात आलेली नाही. मला विनाकारण दीड तास रांगेत ताटकळावे लागले.

हे वाचले का?  गणेशोत्सवातील ‘शिधा’ नवरात्रीत; दिवाळीत ‘आनंदा’ला तोटा!

– भगवान औटी, ग्राहक