आगामी तीस वर्षांत लोकसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता आवश्यक असणाºया पायाभूत सुविधा आणि शहर विकासासाठीचा एकूणच प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी भुसे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते
सर्वपक्षीय बैठकीत कृषिमंत्री दादा भुसे यांचा निर्धार
मालेगाव : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्मार्ट सिटीच्या धर्तीवर विकास आराखडा बनविण्याचा निर्धार कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केला. शहर विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत नव्या वर्षाच्या प्रारंभी या आराखड्याची अंमलबजावणी दृश्य स्वरूपात दिसू लागेल, असा विश्वासही भुसे यांनी व्यक्त केला.https://0083d518171bc50fbf6fdc19599c4159.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-38/html/container.html
आगामी तीस वर्षांत लोकसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता आवश्यक असणाºया पायाभूत सुविधा आणि शहर विकासासाठीचा एकूणच प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी भुसे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस ‘एमआयएम’चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, सेनेचे तालुकाध्यक्ष संजय दुसाने, शहराध्यक्ष रामा मिस्तरी, राष्ट्रवादीचे राजेंद्र भोसले, विनोद शेलार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र ठाकरे, प्रसाद हिरे, मनसेचे राकेश भामरे, ‘आरपीआय’चे भारत चव्हाण आदी उपस्थित होते.
महापौर, आमदार, पालिका आयुक्त व विविध पक्षीय गटनेत्यांच्या उपस्थितीत विकास आराखडा बनविण्याची प्रक्रिया तातडीने हाती घेण्यात येईल. केवळ शहर विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून हा आराखडा करण्यात येणार असून त्यासाठी सर्वपक्षीय भावनांचा कटाक्षाने आदर केला जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. बैठकीत रस्त्यांच्या दुरवस्थेच्या तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला. त्यावर पावसाळा संपल्यावर ही कामे तातडीने सुरू होतील, आणि ही कामे दर्जेदार होतील, याची खबरदारी घेण्यात येईल, असे सांगत बनावट कामे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा भुसे यांनी दिला. भविष्यात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होणार असल्याने तुटीच्या गिरणा खोºयासाठी पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी वळवणे, हाच चांगला उपाय आहे. त्यासाठी शासन स्तरावरून पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजप जिल्हाध्यक्षांचा सभात्याग
मालेगावच्या सर्वांगीण विकासासाठी एखाद्या मंत्र्याने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करत लोकभावना जाणून घेण्याचा आजवरचा हा पहिलाच प्रयत्न. त्यामुळे सर्वपक्षीय वक्ते त्याबद्दल भुसे यांची प्रशंसा करत विविध सूचना मांडत होते. बैठकीतील चर्चा ऐन रंगात आली असताना काँग्रेसचे प्रसाद हिरे भाषणासाठी उभे राहिले. त्यांनी उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी बळी घटनेचा सर्वपक्षीय निषेध करू या, म्हणतच भाषणाला सुरुवात केली. ही बाब व्यासपीठावर उपस्थित भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांना खटकली. ते तडक बैठकीतून निघून गेले. त्यांच्या समवेत भाजपचे अन्य पदाधिकारी व नगरसेवकांनीही मग सभात्याग केला. यावेळी सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीतून निघून जाणाºया निकम यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु मौन पाळत ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. विकासाच्या मुद्द्यावर बोलावलेल्या बैठकीत हिरे यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याची टीका नंतर भाजपतर्फे करण्यात आली.