‘स्मार्ट सिटी’मध्ये चिनी कॅमेऱ्यांचा वॉच

image, sign, warning
Photo by ROverhate on Pixabay

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात चिनी बनावटीचे ११०० कॅमेरे बसविण्याचा घाट भाजप घालत आहे. भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेने या निकृष्ट कॅमेऱ्यांवर फुली मारली असताना नाशिक महापालिकेतील सत्ताधारी तसेच कंपनीवर संचालक असलेल्या भाजप सदस्यांनी मात्र या चिनी साहित्याबाबत बोटचेपी भूमिका स्वीकारली आहे. या निकृष्ट कॅमेरे खरेदीच्या चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केली आहे.

भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात भाजपचे संचालक आहेत. स्मार्ट सिटीत आता शहरात ११०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हिकव्हिजन या कंपनीस कंत्राट देण्यात आले आहेत. या कंपनीने २० ते २५ कॅमेरे प्रायागिक तत्वावर बसविले असून त्याची चाचपणी सुरू आहे. या कंपनीच्या कॅमेऱ्याच्या दर्जाविषयी असंख्य प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सध्या बसविलेले कॅमेरे नवीन नामांकन नियमात बसत नसल्याची तक्रार रंजन ठाकरे यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे.

हे वाचले का?  “जेवढं गोडी गुलाबीने घ्याल तेवढं तुमच्यासाठी…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांना पुन्हा इशारा

याच हिकव्हिजन कंपनीने नागपूर शहरातही ६०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर दर्जाचा प्रश्न निर्माण झाला. त्या कॅमेऱ्यांची तीन वेळेस चाचणी घेतल्यानंतर त्यात ओएफसी केबलचा निकृष्ट असल्याच्या तक्रारीमुळे भाजपने त्याला विरोध केला. मात्र, आता त्याच कंपनीला नाशिकमध्ये कंत्राट देण्यात आल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे.