मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी राज्याच्या अनेक जिल्ह्यांतील शेकडो महिला शनिवारी रात्री रस्त्यांवर उतरल्या.
पीटीआय, इंफाळ
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी राज्याच्या अनेक जिल्ह्यांतील शेकडो महिला शनिवारी रात्री रस्त्यांवर उतरल्या.
हातात मशाली घेतलेल्या मैतेई महिलांनी सायंकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, थौबाल आणि काकचिंग जिल्ह्यांमध्ये रस्त्यांवर मानवी साखळी तयार केली.
‘हिंसाचार आटोक्यात आणण्यात व सुरक्षा पुरवण्यास केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरल्याबद्दल आम्ही अतिशय निराश आहोत’, असे महिला नेत्या थोऊनाजोम किरण देवी यांनी कोंगबा येथे पत्रकारांना सांगितले. म्यान्मारमधील अवैध स्थलांतरितांच्या घुसखोरीविरुद्धही महिलांनी निदर्शने केली. राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या घोषणा त्यांनी दिल्या.मणिपूरमध्ये मैतेई व कुकी समुदायांमध्ये सुमारे महिनाभरापूर्वी उफाळलेल्या वांशिक हिंसाचारात आतापर्यंत शंभराहून अधिक लोकांचे बळी गेले आहेत.
‘शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपाययोजना करा’
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा निषेध करतानाच तत्काळ शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना करण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्थानिक प्रशासनासह सरकार, पोलीस, सुरक्षा दले आणि केंद्रीय यंत्रणांना केले आहे. या हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्यांना मदत साहित्याचा अखंड पुरवठा होईल हे सुनिश्चित करावे, तसेच या राज्यात शांतता व सलोखा राखण्यासाठी आवश्यक ती कृती करावी, असेही आवाहन संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी या सर्वाना केले आहे.लोकशाही व्यवस्थेत द्वेष आणि हिंसाचार यांना थारा नसल्याचे सांगतानाच, ज्या विश्वासाच्या अभावामुळे सध्याचे संकट उद्भवले त्यावर दोन्ही बाजूंनी मात करावी आणि शांतता पुनस्र्थापित करण्यासाठी संवादाची सुरुवात करावी, यावर संघाने भर दिला आहे.