हिजाबच्या निमित्ताने मालेगावात राजकीय चढाओढ

हिजाब परिधान करण्यावरून कर्नाटक राज्यात उद्भवलेल्या वादाची प्रतिक्रिया म्हणून संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मालेगावातील वातावरण ढवळून निघाले आहे.

मालेगाव : हिजाब परिधान करण्यावरून कर्नाटक राज्यात उद्भवलेल्या वादाची प्रतिक्रिया म्हणून संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मालेगावातील वातावरण ढवळून निघाले आहे. प्रामुख्याने भावनिक मुद्दय़ांभोवती राजकारण फिरणाऱ्या या शहरातील राजकारण्यांना यानिमित्ताने नवीन विषय मिळाला असून महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने या विषयाचा राजकीय लाभ उठविण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाल्याचे चित्र आहे.

मुस्लीमबहुल मालेगावच्या राजकारणात विकासापेक्षा भावनिक मुद्दे अधिक प्रभावी ठरत असल्याची प्रचीती आजवर अनेकदा आली आहे. येथील राजकारणाचा हा बाज लक्षात घेता स्थानिक राजकारणी त्याच दृष्टीने रणनीती अवलंबण्यास प्राधान्य देत असतात. त्यातून देशातीलच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्भवलेला एखादा भावनिक मुद्दाही या शहरातील वातावरण तापविण्यास कारणीभूत ठरत असतो. डिसेंबर १९९२ मध्ये अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया मालेगावात लगेच उमटली होती. दिवंगत ज्येष्ठ समाजवादी नेते निहाल अहमद यांनी या घटनेचा निषेध म्हणून दंडाला अखेपर्यंत काळी पट्टी बांधली होती. इराक-अमेरिका वादानंतर अमेरिकेचा निषेध तसेच तेथील वस्तुंवर बहिष्कार टाकण्यासाठी २० वर्षांपूर्वी मालेगावात मोर्चा काढण्यात आला होता. वरील उदाहरणे ही वानगीदाखल आहेत.

हे वाचले का?  गणेश विसर्जनाची पर्यावरणस्नेही तयारी; नाशिकरोड विभागात फिरता तलाव, २९ नैसर्गिक विसर्जन स्थळे- ५६ ठिकाणी कृत्रिम तलाव

कर्नाटकमधील हिजाब प्रकरणावरून येथील मुस्लीम समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यक्रमात हा मुद्दा आला आहे. मालेगाव महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. तसेच काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांच्यापाठोपाठ महापौर ताहेरा शेख यांसह अन्य २७ नगरसेवकांनी काँग्रेसचा त्याग करत अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या छावणीत उत्साह संचारल्याचे चित्र आहे. हा उत्साह टिकवून ठेवणे तसेच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक जनमत आपल्याकडे वळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला हिजाबचा मुद्दा उचलून धरणे भाग पडले आहे. प्रतिस्पर्धी एमआयएम.पक्षाचे आमदार आणि धार्मिक वलय लाभलेले मौलाना मुफ्ती इस्माईल यांनीही हिजाबच्या समर्थनार्थ मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

दोन दिवसांपूर्वी महापौर ताहेरा शेख यांनी या विषयावरून येथील प्रांत कार्यालयावर विद्यार्थिनींसह महिलांचा मोर्चा काढला. पाठोपाठ आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत विद्यार्थिनींना हिजाब परिधान करण्यास विरोध करणे हे धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा प्रकार असल्याचा सूर लावला. त्यानंतर मौलाना हे प्रमुख असलेल्या जमियत उलेमा या धार्मिक संघटनेच्या वतीने गुरुवारी शहरात हिजाब समर्थनार्थ महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी मेळाव्यास परवानगी नाकारल्यानंतरही आयोजकांनी मेळावा घेण्याची आगळीक केली. अर्थात हा प्रमाद केल्याप्रकरणी आता पोलिसांनी मेळाव्याच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेला मोर्चाही विनापरवानगी असल्याने त्याही प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मौलानांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यास महिलांच्या लाभलेल्या लक्षणीय उपस्थितीमुळे सर्वाच्या भुवया उंचावल्या गेल्या.

हे वाचले का?  नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले

या मेळाव्यास मिळालेल्या प्रतिसादाची त्यामुळे शहरात जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर सायंकाळी महापौर ताहेरा शेख यांनी कर्नाटकातील मुस्कान खान या विद्यार्थिनीचे कौतुक करणारी चित्रफीत प्रसारित केली. हिजाब परिधान करण्यास विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटास मुस्कान हिने धैर्याने उत्तर दिल्याचे नमूद करत मालेगावात आठ कोटी खर्चाने उभारण्यात येणाऱ्या उर्दू घरास मुस्कानचे नाव देण्याचा इरादाही महापौरांनी जाहीर केला आहे. याशिवाय जमियत उलेमा या संघटनेच्या आवाहनानुसार शुक्रवारी हिजाबच्या समर्थनार्थ आयोजित हिजाब दिनास शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यानिमित्ताने मुस्लीमधर्मीय महिला हिजाब आणि बुरखा घालूनच घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले. हिजाब दिनाच्या पार्श्वभूमीवर अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या नेतृत्वाखाली शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील हे शहरात तळ ठोकून होते.

हे वाचले का?  संविधान वाचविण्यासाठी राज्यभर सभांव्दारे प्रबोधन – श्याम मानव यांची मोहीम