११ हजार उच्चशिक्षित पोलीस भरतीच्या शर्यतीत….

रायगड पोलीस दलातील ४२२ रिक्त पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. ज्यात अनेक उच्च शिक्षित उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

अलिबाग : रायगड पोलीस दलातील ४२२ रिक्त पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. पोलीस शिपाई, चालक आणि बँण्ड्समन पदासाठी सुरू असलेल्या भरतीसाठी ३१ हजार ०६३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यापैकी तब्बल ११ हजार २३३ उच्च आणि अतिउच्च शिक्षित आहेत. ज्यात सनदी लेखापाल, वकील, इंजिनिअर्स, एमबीए, बी फार्म, एम फार्म, बीटेक, एमटेक, एमएसडब्ल्यू अशा उच्च शिक्षित उमेदवारांचा समावेश आहे.

रायगड पोलीस दलातील ४२२ जागांसाठी भरती प्रक्रीया सध्या सुरू आहे. यात ३९१ पोलीस शिपाई, ९ बॅन्ड्समन पोलीस शिपाई आणि ३१ चालक पोलीस शिपाई पोलीस पदांचा समावेश आहे. राज्यभरातून यासाठी ३१ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सध्या या उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरू आहे. आत्ता पर्यंत जवळपास २५ हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी पूर्ण झाली असून सहा हजार उमेदवारांची चाचणी अद्याप शिल्लक आहे. यात प्रामुख्याने महिला उमेदवारांचा समावेश आहे.

हे वाचले का?  पूर्व लडाखमध्ये सैन्यमाघारी पूर्ण, भारत-चीन सैनिकांमध्ये आज दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाण

पोलीस शिपाई पदासाठी शिक्षणीक आर्हता ही बारावी पास असली तरी या भरती हजारो उच्च आणि अतिउच्च शिक्षित तरुणांनी अर्ज दाखल केले आहे. यानिमित्ताने तरुणासमोरील बेरोजगारीचे वास्तव समोर आले आहे. शासकीय नोकरी कडे असलेली ओढही यास काही प्रमाणात कारणीभूत ठरत आहेत.

उच्च शिक्षित उमेदवारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. विशेषत्वाने बॅचलर ऑफ इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलेल्या १८६ उमेदवारांनी पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केला आहे. त्या पाठोपाठ बी.टेक पदवी प्राप्त ७७ विद्यार्थी आहेत. एमबीए अर्थात व्यवस्थापन शाखेत पदवीप्राप्त ४ विद्यार्थ्यांनी या पदासाठी अर्ज केला आहे. एमसीए १०, बी. फार्मसी ३५, एम फार्मसी २, बिसीए १०६, बीबीए १५, एमएसडब्ल्यू १८, , बीएसस्सी ॲग्री १६२ व बीएसडब्ल्यू १२, सनदी लेखापाल पदाची परिक्षा उत्तीर्ण झालेल्या एका तर ६ एलएलबी पदवीधारकांनी पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करून शाररीक चाचणी दिली आहे.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Election 2024 : देशाच्या पंतप्रधानांचं महाराष्ट्राला आवाहन; नरेंद्र मोदी सोशल पोस्टमध्ये म्हणाले, “आज महाराष्ट्र…”!

कला शाखेच्या ५ हजार ७९१ पदवीधारकांनी, तर पदवीत्तर पदवी घेतलेल्या ५८९ जणांनी अर्ज केले आहेत. वाणिज्य शाखेचे २ हजार ४६ पदवीधर भरतीसाठी हजर झाले आहेत. विज्ञान शाखेतून पदवी १ हजार ७७३ आणि पदवीत्तर पदवी १६६ जणांनी भरतीसाठी हजेरी लावली आहे.

इतक्या मोठ्या संख्येत उच्चशिक्षत पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झाल्याने देशातील बेरोजगारीचे संकट या माध्यमातून समोर आले आहे. उच्चशिक्षतही पोलीस भरतीकडे वळल्याने बारावी, बीए, एमए, बीकॉम पदवी घेतलेल्या सामान्य उमेदवारांची चांगलीच अडचण झाली आहे.