पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला तालुक्यात गाव, वाडय़ांची संख्या ५१ असून तिथे १९ टँकरने पाणी दिले जात आहे.
नाशिक: पावसाचे लवकरच आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असला तरी मे महिन्यातील रणरणत्या उन्हात जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. गतवर्षीचा विचार करता त्यामध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली. सध्या जिल्ह्यातील २०० गाव, वाडय़ांना ७१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी गाव, वाडय़ांची संख्या याच काळात ११७ होती.
ग्रामीण भागात मे महिन्यात टंचाईच्या झळा अधिक तीव्र होतात. त्याची प्रचीती यंदाही येत आहे. जिल्ह्यातील १० तालुक्यांतील गाव, वाडय़ांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. दिंडोरी, कळवण, नांदगाव, नाशिक आणि निफाड या पाच तालुक्यांत कुठेही टँकरने पाणी द्यावे लागले नाही. उन्हाची तीव्रता जशी वाढली, तशी टंचाईग्रस्त गावांची यादी विस्तारली. सध्या सिन्नर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ५८ गाव, वाडय़ांना ११ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला तालुक्यात गाव, वाडय़ांची संख्या ५१ असून तिथे १९ टँकरने पाणी दिले जात आहे.
बागलाण तालुक्यात १९ गावे-वाडय़ा (१० टँकर), चांदवड तालुक्यात ११ (पाच टँकर), देवळा पाच (दोन), इगतपुरी ११ (तीन), मालेगाव १५ (सहा), पेठ १३ (सात), सुरगाणा नऊ (सहा), त्र्यंबकेश्वर आठ (दोन टँकर) अशी स्थिती असल्याचे टंचाई शाखेने म्हटले आहे. जिल्ह्यात २०० गाव, वाडय़ांना एकूण ७१ टँकरने पाणी दिले जात आहे. मागील वर्षी २६ मे रोजी जिल्ह्यात ११७ गावांना ५२ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता.
पावसाचे प्रमाण समाधानकारक असूनही यंदा पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणाऱ्या गावांची संख्या वाढली. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्यावेळी सिन्नर तालुक्यातील एकाही गावाला टँकरची निकड भासली नव्हती. यंदा ५८ गाव, वाडय़ात टंचाईची स्थिती आहे. नांदगाव तालुक्यात गेल्या वर्षी एका गावाला टँकरने पाणी द्यावे लागले. यंदा या तालुक्यात कुठेही टँकर सुरू नाही.
टंचाई निवारणार्थ ठोस कृती काय?
पाणी टंचाईच्या संकटाला तोंड देण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा तयार केला होता. त्यानुसार ३१ गाव-वाडय़ांवरील नळ योजना पूर्ण करणे, २३७ गाव-पाडय़ांवर नवीन विंधन विहिरी, विहिरींची खोली वाढविणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण आणि जिथे काहीच पर्याय नाही अशा गाव-वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठय़ाचे नियोजन होते. यातील टँकरने पाणीपुरवठा वगळता उर्वरित उपायांवर नेमके काय काम झाले, हे गुलदस्त्यात आहे. दरवर्षी टंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला जातो. यात टँकरने पाणीपुरवठय़ावर जास्त भिस्त असते. परिणामी, कायमस्वरूपी उपाय दृष्टिपथास येत नसल्याचे चित्र आहे.