वाचा उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले…
“मावळते वर्ष करोना संकटाशी लढण्यातच निघून गेले. येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य, समाधान घेऊन येवो. मावळत्या २०२० या वर्षाने आपल्याला जीवनाच्या बाबतीत खूप काही शिकवलं. आता नववर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण जग करोनामुक्त होवो आणि साऱ्यांना मुक्तसंचाराचा आनंद घेण्याची संधी लवकर मिळो”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नववर्षांच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.
“मावळत्या वर्षाने आपल्याला जीवन जगण्यासंदर्भात अनेक नवीन गोष्टी शिकवल्या. त्या गोष्टींपासून बोध घेऊन नववर्षाची सुरूवात करुया. करोनाचे संकट अद्याप कायम असल्याने मास्क लावणे, गर्दी टाळणे, हात वारंवार धूत राहणे या त्रिसूत्रीचे पालन करूया. करोनापासून स्वतःचे आणि कुटुंबाचे व समाजाचे संरक्षण करत दैनंदिन व्यवहार हळूहळू काळजीपूर्वक सुरु करूया”, असे विनंतीयुक्त आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
“येणारे नवीन वर्ष राज्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांसह सर्व बांधवांना विकासाची संधी उपलब्ध करुन देणारे आणि राज्याला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर नेणारे ठरेल”, असा विश्वासही उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला.
नववर्षाच्या स्वागताचा केक गृहमंत्री पुणे पोलिसांसोबत कापणार
‘थर्टीफर्स्ट’च्या आणि नववर्षाच्या स्वागताची तयारी करणाऱ्यांना राज्याच्या गृहमंत्रालयाकडून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रात्री ११ वाजल्यानंतर पब्स, बार वगैरे बंद असणार आहेत. अशा परिस्थितीत कर्तव्यदक्ष पोलिसांचा उत्साह वाढवण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे रात्री १२ वाजता पुणे पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात उपस्थित राहणार आहेत. आगामी वर्ष आशादायी असल्याचा विश्वास व्यक्त करत ते ‘HOPE 2021’ असा लिहिलेला केकही पोलीस कर्मचारी वर्गासोबत कापणार आहेत.