मराठ्यांचं आरक्षण कुणामुळे रोखलं गेलं त्याची यादीच जाहीर करु असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
माझी प्रकृती आता व्यवस्थित झाली आहे. मी पुढच्या दोन तीन दिवसात माझं काम पुन्हा सुरु करतो आहे. मराठा समाजासाठी सरकारकडून जोरदार काम सुरु आहे. मराठ्यांच्या पदरात प्रमाणपत्रं पडू लागली आहेत. जेव्हा नाराजी व्यक्त करायची होती तेव्हा आम्ही ती व्यक्त केली पण आज पूर्ण ताकदीने सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात काम करतं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यासाठी कक्षही सुरु केले आहेत. यावरुन लक्षात येतं आहे की सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिरंगाई करत नाही. जर त्यांनी दिरंगाई केली तर आम्ही सावध आहोतच.
ओबीसी नेते एकवटले असतील, मात्र सामान्य ओबीसींना हे माहीत आहे की आमचे पुरावे मिळत आहेत. आम्ही ओबीसींचं आरक्षण घेत नाही. जे आमचं आहे तेच घेत आहोत. आमची बाजू सत्य असल्यानेच सरकार हे करतं आहे असंही जरांगे पाटील म्हणाले. कुणी असा दावा केला की आमचं आरक्षण हिरावून घेत आहेत तरीही आमच्याकडे पुरावे आहेत की आम्ही पूर्वीपासून कुणबी आहोत. आता हे सामान्य ओबीसींना पटू लागलं आहे. आम्ही असं केलेलं नाही की आमच्याकडे पुरावा नाही आणि आम्ही ओबीसींमध्ये गेलोय. तसं केलेलं नाही, आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून आम्हाला कुणबी प्रमाणपत्रं मिळू लागली आहेत. त्यांनी आम्हाला विरोध कधी केला असता? जर आमच्याकडे पुरावा नसता तर. मात्र ओबीसी बांधवांना माहीत आहे की आमच्याकडे पुरावे आहेत. सामान्य ओबीसींना माहीत आहे की मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावण्याचं काम ओबीसी नेते करत आहेत हे हेच लोक म्हणत आहेत कारण त्यांना वस्तुस्थिती समजली आहे.
ओबीसी बांधवांना मी सांगू इच्छितो की आमच्याकडे पुरावे आहेत. एखाद्याची जमीन आहे आणि त्याचे पुरावे असतील तर ती जमीन त्याला मिळाली पाहिजे. गोरगरीबांचं वाटोळं झालं पाहिजे हे ओबीसी नेत्यांच्या मनात आहे. ओबीसी बांधवांच्या मनात काहीही नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सरकार जे खरं आहे ते करतं आहे. आत्तापर्यंत ४० वर्षे मराठा बांधवांचं नुकसान झालं आहे. आता ओबीसी लोकांना हे कळलं आहे. ओबीसी नेत्यांचं ते ऐकणार नाहीत अशी आम्हाला खात्री आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आमचंच आरक्षण आम्हाला दिलं जातं आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारचं म्हणणं योग्यच आहे असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.
२४ डिसेंबरपर्यंत जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर ओबीसी नेत्यांची नावं जाहीर करणार आहोत. कोण कोण ओबीसीमध्ये २० वर्षांपासून आहेत आणि आपलं आरक्षण कुणी दिलं ती नावं जाहीर करणार आहोत असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. आमचं हक्काचं आरक्षण जे आहे ते आम्हाला मिळणार आहेच. जे विरोध करत आहेत त्यांनी सांगावं की नेमका विरोध कशासाठी? आमच्या हक्काच्या सुविधा आहेत आणि जे ओबीसींना मिळतं त्या सुविधा आम्हाला मिळाव्यात असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.