५० कोटी भारतीयांना मिळाली करोनाची लस! पंतप्रधान म्हणतात, “मला आशा आहे की…!”

देशात ५० कोटी भारतीयांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्याचं पंतप्रधानांनी कौतुक देखील केलंय.

संपूर्ण देशभरात केंद्र सरकारकडून मोफत आणि व्यापक लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आल्यापासून देशाक केंद्र सरकारकडूनच सर्व राज्यांमध्ये लसींचा पुरवठा केला जात आहे. या वर्षाखेरीस पर्यंत अर्थात डिसेंबर २०२१ पर्यंत देशातील सर्वांना लस देण्याचं लक्ष्य केंद्र सरकारने जाहीर देखील केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत देशात ५० लाख भारतीयांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दिली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी यासंदर्भात ट्वीट देखील केलं आहे. तसेच, सर्वांसाठी मोफत लस या कार्यक्रमाचं कौतुक देखील केलं आहे.

पंतप्रधानांचं ट्वीट…

५० कोटी लसींचा टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक करणारं ट्वीट केलं आहे. “करोनाविरोधातल्या भारताच्या लढ्याला एक प्रबळ प्रेरणा मिळाली आहे. आपल्या लसीकरण मोहिमेनं ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. मला आशा आहे की यात उत्तरोत्तर भर पडत जाईल आणि सर्वांना मोफत लसीकरण मोहिमेमध्ये आपल्या नागरिकांना लस दिली जाईल”, असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं आहे.

हे वाचले का?  पूर्व लडाखमध्ये सैन्यमाघारी पूर्ण, भारत-चीन सैनिकांमध्ये आज दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाण

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारी दिवसभरात भारतात ४३ लाख २९ हजार करोनाचे डोस देण्यात आले आहेत. “भारतानं कोविड १९ साठीच्या लसीकरणात मोठी झेप घेतली आहे. आजपर्यंत भारताने ५० कोटी लसी देण्याचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे”, असं ट्वीट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. यामध्ये १७ कोटी २३ लाख २० हजार ३९४ नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे.

आकडेवारी काय सांगते?

आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात १० कोटी नागरिकांना लस देण्यासाठी ८५ दिवस लागले. त्यानंतर पुढचे १० कोटी डोस देण्यासाठी ४५ दिवस लागले. ३० कोटींचा टप्पा पार करण्यासाठी भारताला अजून २९ दिवस लागले. त्यापुढचे १० कोटी डोस देण्यासाठी २४ दिवस तर ५० कोटींचा टप्पा पार करण्यासाठी त्यापुढे अवघे २० दिवस लागले.

हे वाचले का?  टाटा ट्रस्टला मिळाले नवे चेअरमन! रतन टाटांनंतर कुटुंबातील ‘या’ सदस्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येकी १ कोटींहून जास्त नागरिकांना लस दिली आहे. तर, आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, हरयाणा, झारखंड, केरळ, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येकी १० लाख नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे

ही अभिमानाची बाब!

दरम्यान, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि नाशिकमधील भाजपाच्या खासदार भारती पवार यांनी या कामगिरीचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. “भारतात लसीकरणाने ५० कोटींचा टप्पा ओलांडला ही अभिमानाची बाब आहे. देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहोचावी, यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे”, असं भारती पवार म्हणाल्या आहेत.

हे वाचले का?  Crime News : ट्यूशनवरुन घरी पतरणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, बेशुद्धावस्थेत सापडली मुलगी, कुठे घडली घटना?