८७९ टपाल कार्यालये ‘इंटरनेट’पासून वंचित; महाराष्ट्र विभागातील १०१ कार्यालयांचा समावेश

डिजिटल क्रांतीच्या युगातही देशातील ८७९ टपाल कार्यालयांत ‘इंटरनेट’ आणि भ्रमणध्वनीचे ‘नेटवर्क’ उपलब्ध नाही. त्यात महाराष्ट्र सर्कलमधील १०१ कार्यालयांचा समावेश आहे.

नागपूर : डिजिटल क्रांतीच्या युगातही देशातील ८७९ टपाल कार्यालयांत ‘इंटरनेट’ आणि भ्रमणध्वनीचे ‘नेटवर्क’ उपलब्ध नाही. त्यात महाराष्ट्र सर्कलमधील १०१ कार्यालयांचा समावेश आहे. ही संख्या देशात चौथ्या क्रमांकाची आहे.देशात काही ठिकाणी ‘५-जी’ सेवेला सुरुवात झाली आहे. अनेक सेवा ‘अॅप’च्या माध्यमातून उपलब्ध आहे. असे असले तरी अजूनही दुर्गम भागातील अनेक गावे आहेत जेथे या क्रांतीचा लाभ पोहोचला नाही. केंद्रीय दूरसंचार खात्याच्या माहितीनुसार देशभरातील २१ टपाल सर्कलमधील ८७९ टपाल शाखा कार्यालयात भ्रमणध्वनीचे ‘नेटवर्क’ व इंटरनेट ‘कनेक्टिव्हिटी’ नाही. यात महाराष्ट्र सर्कलमधील १०१ टपाल कार्यालयांचा समावेश आहे. या सर्कलमध्ये गोव्याचाही समावेश होतो हे येथे उल्लेखनीय. ही सर्व गावे प्रामुख्याने डोंगराळ भागातील आहेत.

हे वाचले का?  Shivaji Maharaj Statue : शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नव्या पुतळ्यासाठी योजना तयार

देशातील पूर्वेत्तर भागातील राज्यांमधील गावांमध्ये ही समस्या सर्वाधिक आहे. तेथील १५२ टपाल कार्यालयात ‘कनेक्टिव्हिटी’ नाही. जम्मू काश्मीर, लडाख भागातील ११५, पश्चिम बंगाल सर्कलमधील (पश्चिम बंगालसह सिक्कीम-अंदमान निकोबार) १०६ कार्यलयात कनेक्टिव्हिटी नाही. आंध्र प्रदेशात ७६, छत्तीसगडमध्ये ९५ टपाल कार्यालयांचीही हीच स्थिती आहे.

केंद्र सरकारचा पुढाकार..

सर्व गावांना ‘इंटरनेट’ने जोडण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. ‘कनेक्टिव्हीटी’ नसलेल्या देशभरातील २४ हजार ६८० गावे ‘४-जी’ सेवेत समाविष्ट करण्याची योजना असून डिसेंबर २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. देशभरात एकूण १ लाख ५९ हजार ३९२ टपाल कार्यालये आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील कार्यालयांची संख्या ही १३,६९१ असून त्यात मुख्य टपाल कार्यालये (६१), उप कार्यालये (२१५४) आणि शाखा कार्यालये (११,४७६) आदींचा समावेश आहे.

हे वाचले का?  लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका

चंद्रशेखर बोबडे