९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक नगरीत होत आहे.
लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक नगरीत होत आहे. नाशिक की दिल्ली या संमेलन स्थळावरून मध्यंतरी बरीच रस्सीखेच झाली होती. यात अखेरीस नाशिकची निवड झाली. लोकहितवादी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून हे यश मिळवले. या पाश्र्वभूमीवर, साहित्यिक संस्थांच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी लोकहितवादी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे.
हे संमेलन नाशिकमध्ये व्हावे, यासाठी गेल्या वर्षी सार्वजनिक वाचनालयाने प्रयत्न केले होते. या वर्षी सार्वजनिक वाचनालय इच्छुक नसल्याचे कळल्यावर लोकहितवादी मंडळाने क्षणाचाही विलंब न करता आपला प्रस्ताव सादर केला होता. दिल्लीतील मराठी जनांना मायबोलीचा उत्सव साजरा करता यावा म्हणून सरहद्द संस्थेने मागील वर्षी आयोजनाचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा उस्मानाबादची वर्णी लागली होती. किमान यंदातरी आपला विचार होईल असे दिल्लीकरांना वाटत होते. संमेलन नाशिकला मिळतेय हे समजल्यावर सरहद्द संस्थेने महामंडळाला प्रस्तावाबाबतचे स्मरणपत्र पाठविले होते. अखेरीस नाशिकच्या प्रस्तावावर साहित्य महामंडळाने शिक्कामोर्तब के ले. हे संमेलन नाशिकमध्ये व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हे यश मिळाल्याने मंडळाचे पदाधिकारी कौतुकास पात्र असल्याचे नाशिक कवी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मगर, कार्याध्यक्ष शरद पुराणिक यांनी म्हटले आहे.
या यशानिमित्त नाशिकमधील सर्व साहित्य संस्थांच्यावतीने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी खास कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता मखमलाबाद रस्त्यावरील भावबंधन मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सार्वजनिक वाचनालय (सावाना), कुसुमाग्रज प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषद (नाशिकरोड), नाशिक कवी, मराठी कथा लेखक संघ, संवाद, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ (नाशिक शाखा), कुसुमाग्रज साहित्यिक मंच, साहित्य कणा, काव्यमंच,नारायण सुर्वे कवी कट्टा, गिरणा गौरव परिवार, साहित्य-कला-व्यक्ती विकास मंच, विश्व मराठी परिषद, कुसुमाग्रज मराठी विचार मंच, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, नाशिक साहित्य मंच, परिवर्त परिवार, साहित्य रसिक मंडळ, सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ, कादवा शिवार, इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आदींचे पदाधिकारी उपस्थित राहतील. तसेच सुभाष वाचनालय, पंचवटी वाचनालय, ज्ञानेश्वर वाचनालय, सुधीर फडके वाचनालय, सर्वात्मक वाचनालय या आणि इतर साहित्यिक संस्थांचे पदाधिकारी, काही निमंत्रित साहित्यिक उपस्थित रहाणार असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे. करोनाच्या पाश्र्वभूमीवर सभागृहात सर्व नियमांचे पालन करून हा सोहळा होणार असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे.