सहा महिन्यांत दोन संमेलने घेण्याचा महामंडळाचा प्रयत्न?
सहा महिन्यांत दोन संमेलने घेण्याचा महामंडळाचा प्रयत्न?
औरंगाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे संमेलन नाशिकमध्ये आयोजित करण्यावर गेल्या आठवडय़ात शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता ९५वे संमेलन घेण्यासाठी स्थळ ठरवण्यावर पदाधिकाऱ्यांमध्ये मंथन सुरू आहे.
पुढील वर्षांच्या मार्चअखेपर्यंत जमा-खर्चाचा ताळेबंद मांडण्यासाठी महामंडळाला सहा महिन्यांत दोन संमेलने घेणे सोयीस्कर व्हावे, या दृष्टीने ९५वे संमेलन घेण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र, पुढील वर्षी शतक महोत्सवी वर्षांत पदार्पण करणाऱ्या विदर्भ साहित्य संघाने ९५ वे संमेलन घेण्याविषयीचा प्रस्ताव मागे घेतल्याने महामंडळाची अडचण झाली आहे. विदर्भ साहित्य संघाचा २०२३ मध्ये संमेलन घेण्याचा विचार आहे.
औरंगाबादमध्ये रविवारी झालेल्या बैठकीत नाशिकमधील संमेलनाचे नियोजन, त्यासंदर्भाने पत्रव्यवहार करण्याबाबत चर्चा झाली. मात्र, ९५ वे संमेलनस्थळ निवडण्यासह मार्गदर्शन समिती नियुक्त करण्याचाही विषय बैठकीच्या विषयपत्रिकेत होता. नाशिकचे संमेलन नोव्हेंबरमध्ये घेण्याची चर्चाही महामंडळाच्या बैठकीत झाली. नोव्हेंबरमध्ये ९४ वे संमेलन घेण्यात आले तर पुढीलवर्षी मार्चच्या आत ९५ वे संमेलन घेण्यासाठी महामंडळाची घाई सुरू आहे. त्या अनुषंगाने संमेलनस्थळ निवडण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा विषय बैठकीत होता. मात्र, औरंगाबादबाहेरून आलेल्या महामंडळाच्या घटक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आधी नाशिकचे नियोजित संमेलन करोना साथीच्या काळात निर्विघ्न पार पडू द्या, मग ९५ व्या संमेलनाबाबत ठरवू, अशी भूमिका मांडली.
औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ. नांदापूरकर सभागृहात अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक झाली. बैठकीला बृहन्महाराष्ट्र विभागाचे प्रतिनिधीवगळता इतर पदाधिकारी उपस्थित होते. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, तानसेन जगताप, विलास मानेकर, विधाते, गजानन नारे, प्रतिभा सराफ, दादा गोरे आदी यावेळी उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रतिनिधींचा आक्रमक पवित्रा?
‘लोकसत्ता’च्या ५ ऑगस्टच्या अंकात, ‘नागपूरने हात वर करताच नाशिकशी ‘तडजोड’’, या शीर्षकाचे वृत्त प्रकाशित झाले होते. त्याच्या आधारे महामंडळाच्या घटक संस्थांच्या प्रतिनिधींनी बैठकीत आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे ठाले पाटील यांना नमते घेऊन घटक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका मान्य करावी लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बैठकीत नाशिकमधील नियोजित ९४ वे आणि पुढील वर्षांतील ९५ व्या साहित्य संमेलनाबाबत चर्चा झाली. आधी ९४ वे होऊ द्या, मग ९५ व्या संमेलनाबाबत ठरवू, अशी भूमिका आम्ही पुण्याच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. ती महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी मान्य केली. – प्रा. डॉ. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, साहित्य महामंडळ.