अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या सविस्तर तपशील

१७ मे पासून ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्यास सुरुवात

राज्यात दरवर्षी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दहावीच्या निकालानंतरच सुरू केली जाते. मात्र  शैक्षणिक वर्ष २०२२-२३मध्ये राबवल्या जाणाऱ्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. १ ते १४ मे दरम्यान प्रवेश अर्ज ऑनलाइन भरण्याचा सराव करता येणार असून, १७ मेपासून प्रत्यक्ष अर्ज भरणे, अर्ज पडताळणीची कार्यवाही करण्यात येईल.

राज्यातील पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक या महापालिका क्षेत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते. या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी अकरावीच्या आगामी प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक आणि मार्गदर्शक सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. दरवर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया निकालानंतरच सुरू होत असल्याने ती दीर्घकाळ सुरू राहते. त्यामुळे  मात्र पुढील प्रवेश प्रक्रियेमध्ये निकाल जाहीर होण्यापूर्वी १७ मेपर्यंत प्रवेश अर्जाचा भाग १ भरल्यानंतर निकाल जाहीर होईपर्यंत कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया राबवली जाईल. तर निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश अर्जाचा भाग दोन भरून, महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवणे, गुणवत्ता यादी जाहीर करणे, प्रत्यक्ष प्रवेश देणे आदी प्रक्रिया होईल

हे वाचले का?  Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”

प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी होईल. तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीऐवजी प्रतीक्षा यादी करण्याचे नियोजन असल्याचे  परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. शाळा आणि  कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी २३ मे ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत सुरू राहील. प्रवेश प्रक्रियेची माहिती  या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी तातडीने सुरू करावी. प्रवेश प्रक्रियेचे टप्पे समजावून घेऊन त्यानुसार नियोजन करावे. पालक विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्ग, शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करावे. विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याबाबत संबंधित यंत्रणेस विनंती करावी, अशा सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिल्या आहेत.