एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या कालावधीत नोव्हेंबर २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकींनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेली बंडखोरी अनेकांना आठवली.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी केलेलं बंड त्यानंतर पुढील नऊ दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यामध्ये एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली सत्तेत आलेलं शिंदे गट आणि भाजपाचं सरकार ही राजकीय उलथापालथ देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरली. या सर्व बंडखोरी आणि सत्ता स्थापनेच्या संघर्षामध्ये अनेकांना नोव्हेंबर २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकींनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेली बंडखोरी आठवली. अजित पवार यांनी भाजपासोबत जात सत्ता स्थापन करत थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पहाटेचा शपथविधी त्यावेळी बराच गाजला होता. मात्र हे बंड मोडून काढण्यात शरद पवारांना यश आलं आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. याच बंडाची तुलना सध्याच्या शिंदे गटाच्या बंडाशी करुन शरद पवारांना औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला.
औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकारपरिषदेत राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर प्रथमच रविवारी पवार यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केला. राज्यातील सत्तांतरनाट्य, देशातील विरोधकांची भूमिका, श्रीलंकेतील अराजक आणि न्यायप्रक्रियेबाबत कायदे अभ्यासकांकडून होत असलेली चिंता आदी मुद्दय़ांवर त्यांनी मते व्यक्त केली. नव्या सरकारमधील प्रमुखांकडून येत्या विधानसभा निवडणुकीत २०० जागा निवडून आणू, आदी होत असलेल्या विधानावरही त्यांनी मिश्कीलपणे भाष्य केले. याचदरम्यान अजित पवारांनी केलेल्या बंडाची आठवण करुन देत पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला.
“विधानसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवारांनी बंड केलं होतं. ते बंड मोडण्यात आपण यशस्वी झालात पण मग आता काय कारण आहे की
उद्धव ठाकरे हे बंड मोडू शकलेले नाहीत?,” असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शरद पवारांनी आताची स्थिती आणि तेव्हाची स्थिती वेगळी होती असं सूचित करणारं विधान केलं. “आमच्यात काही झालच नव्हतं. जे गेले त्या लोकांवर आमचं नियंत्रण नव्हतं. आमच्यात काही घडलं असतं तर तुमच्या प्रश्नाला उत्तर देता आलं असतं. पण तसं काही घडलं नव्हतं,” असं उत्तर शरद पवारांनी दिलं.
अजित पवार आणि आपल्यामध्ये कोणतेही मतभेद नव्हते. त्यावेळी जे घडलं ते सारं अचनाक घडलं होतं, असं पवार यांनी या वक्तव्यामधून सूचित केलं. सध्या शिवसेनेनं पुकारलेलं बंड हे वैचारिक मतभेदामधून असल्याचं सांकेतिक विधान पवार यांनी या वेळी केलं. त्याचप्रमाणे अजित पवारांचं बंड हे वैचारिक मतभेदामधून झालेलं नव्हतं. तर आताचं बंड हे वैचारिक मतभेदातून असल्याचं पवार अधोरेखित करत असल्याचं दिसून आलं.