अणू केंद्रक संयोगातून ऊर्जानिर्मिती प्रत्यक्षात येण्यासाठी प्रतीक्षा; अमेरिकेत झालेले संशोधन मूलभूत स्वरूपाचे; शास्त्रज्ञांचे मत

अखंड आणि स्वच्छ ऊर्जेसाठी अणू केंद्रक संयोगातून (न्यूक्लिअर फ्युजन) ऊर्जानिर्मिती महत्त्वाची आहे. अणू केंद्रक संयोगाचा अमेरिकेत यशस्वी झालेला प्रयोग ही त्या दृष्टीने महत्त्वाची घटना आहे.

पुणे : अखंड आणि स्वच्छ ऊर्जेसाठी अणू केंद्रक संयोगातून (न्यूक्लिअर फ्युजन) ऊर्जानिर्मिती महत्त्वाची आहे. अणू केंद्रक संयोगाचा अमेरिकेत यशस्वी झालेला प्रयोग ही त्या दृष्टीने महत्त्वाची घटना आहे. या प्रयोगामुळे अणू केंद्रक संयोगातून ऊर्जानिर्मिती शक्य असल्याचे दिसून येत असले, तरी त्यासाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.   

सूर्याच्या गर्भात सुरू असलेल्या ‘अणू केंद्रक संयोग’ या प्रक्रियेची प्रयोगशाळेत पुनरावृत्ती करून त्यापासून ऊर्जानिर्मिती करण्यात अमेरिकेतील कॅलिफोर्निया लॉरेन्स लिव्हरमूर राष्ट्रीय प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांना यश आले. गेली काही दशके अणू केंद्रक संयोगाबाबत जगभरात मोठय़ा प्रमाणात संशोधन सुरू असताना अमेरिकेतील प्रयोगामुळे अणू केंद्रक संयोगातून ऊर्जानिर्मिती आता दृष्टिक्षेपात आल्याचे मानले जात आहे. 

हे वाचले का?  Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी

अमेरिकेत झालेले संशोधन मूलभूत स्वरूपाचे आहे. या संशोधनात आणखी प्रयोग करून अधिक ऊर्जा विकसित झाल्यास ते फारच उपयुक्त होईल. ही ऊर्जा शाश्वत आणि स्वच्छ असल्याने इंधनाचा प्रश्न सुटेल. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या संशोधनात भारताचाही सहभाग आहे. अमेरिकेत झालेल्या संशोधनातून झालेली जास्त ऊर्जानिर्मितीची  घटना उत्साहवर्धक आहे. येत्या काही वर्षांत अणू केंद्रक संयोग प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत, असे अणुशास्त्रज्ञ डॉ. संजय ढोले यांनी सांगितले.

 ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रभात रंजन प्रोजेक्ट संलयनच्या माध्यमातून व्यावसायिक पद्धतीने अणुकेंद्रक संयोगासाठी प्रयत्नशील आहेत. अमेरिकेतील संशोधनाविषयी प्रा. रंजन म्हणाले,की अमेरिकेत झालेले संशोधन हा महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र त्याचा व्यावसायिकदृष्टय़ा वापर अद्याप शक्य नाही. या बाबत अजून बरेच संशोधन, प्रयोग होणे बाकी आहे. 

हे वाचले का?  Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”

अणू केंद्रक संयोगाचा प्रयोग

 सूर्याच्या केंद्रामध्ये चार हायड्रोजनच्या अणूंपासून हेलियमच्या एका अणूच्या निर्मितीची प्रक्रिया सातत्याने सुरू असते. मात्र, या प्रक्रियेत तयार झालेल्या हेलियमचे वस्तुमान चार हायड्रोजन अणूंपेक्षा कमी असते. हे उर्वरित वस्तुमान ऊर्जेच्या रूपात मुक्त होते. या प्रक्रियेची प्रयोगशाळेत पुनरावृत्ती करण्यासाठी हायड्रोजनच्या दोनपेक्षा अधिक केंद्रकांना एकत्र आणावे लागते. मात्र, त्यासाठी मोठय़ा प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते. अमेरिकेत झालेल्या प्रयोगात हायड्रोजनच्या डय़ुटेरियम आणि ट्रिटियम या समस्थानिकांमध्ये संयोग घडवून त्यावर लेझरचा मारा करण्यात आला. त्यातून हेलियमच्या अणूची निर्मिती झाली. या प्रयोगासाठी लागलेल्या ऊर्जेपेक्षा निर्माण झालेली ऊर्जा जास्त असल्याने हा प्रयोग महत्त्वाचा आहे.

अणू केंद्रक संयोगातून ऊर्जानिर्मितीबाबत संशोधन आणि विकासाचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी मॅग्नेटिक कन्फाईन्मेंट आणि इनर्शियल कन्फाइन्मेंट या दोन प्रमुख पद्धती आहेत. अमेरिकेत झालेले संशोधन दुसऱ्या पद्धतीचे आहे. या संशोधनात लेझर कार्यान्वित करण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा जास्त ऊर्जा निर्माण झाली, म्हणून ही घटना महत्त्वाची आहे. कर्बउत्सर्जनाचा प्रश्न वाढत असताना हे संशोधन नक्कीच मोलाचे आहे. अणू केंद्रक संयोगातून निर्माण होणारी ऊर्जा शाश्वत आहे. भारतातही फ्युजन ऊर्जेबाबतचे काम सुरू आहे.  

हे वाचले का?  कॅनडाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला; भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांचा आरोप; वागणुकीवरही टीकास्रा

– डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ