“अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?” राज ठाकरेंचा सवाल

काहीच दिवसांपूर्वी अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला एक इशारा दिला होता. एका पत्रकाराने याबाबत राज ठाकरे यांची प्रतिक्रिया विचारली असता…

राज्यातील करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दहीहंडी उत्सव साजरा करण्यास राज्य सरकारने यंदा देखील बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने आक्रमक भूमिका घेत सरकारचे नियम डावलून लावत आज (३१ ऑगस्ट) अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा केला. याच्याच समर्थनार्थ भूमिका घेत थोड्याच वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता राज ठाकरे यांनी बोचरी प्रतिक्रिया दिली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर दीर्घ काळापासून बंद असलेली राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी सध्या एकीकडे राज्यातील विरोधी पक्ष चांगला आक्रमक होत असताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे काहीच दिवसांपूर्वी अण्णा हजारे यांनी देखील याचबाबत राज्य सरकारला मंदिरं उघडण्याचा इशारा दिला होता. याविषयी एका पत्रकाराने राज ठाकरे यांची प्रतिक्रिया विचारली असता “अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?” असा उलट सवाल राज यांनी केला आहे. त्याचसोबत राज ठाकरे यांनी या प्रकरणी शिवसेनेपासून भाजपपर्यंत सर्वांवरच टीका केली आहे.

हे वाचले का?  गणेशोत्सवातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; फलकबाजी, आरती संग्रह वितरण, ढोल-ताशा महोत्सव

“…म्हणजे सणांमधून रोगराई पसरते?”

राज ठाकरे राज्यतील सण-उत्सवांवरील बंदी आणि मंदिरं उघडण्यावरील निर्बंधांवर बोलताना म्हणाले कि, “नारायण राणेंच्या विरोधात जे झालं, यांच्या हाणामाऱ्या सुरु आहेत. बाकीच्या सगळ्यांचे मेळावे सुरु आहेत. भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला. म्हणजे यांच्यासाठी मंदिरं सुरु, बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. यांनी मेळावे, सभा घ्यायच्या पण आम्ही दहीडंही साजरी करायची नाही. कुठूनही गर्दी कमी झालेली दिसत आहे का? जन आशीर्वाद यात्रा झाली ती चालली. तेव्हा तुमचा लॉकडाउन नाही. सण आला की लॉकडाउन, म्हणजे सणांमधून रोगराई पसरते.”

हे वाचले का?  Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

अण्णा हजारेंच्या सरकारला सवाल

“मंदिर बचाव कृती समितीने मोठं आंदोलन उभं करावं. प्रसंगी जेलभरो आंदोलन करावं. या आंदोलनात मी अग्रभागी असेन”, अशी ग्वाही अण्णा हजारे यांनी दिली होती. नगरमधील मंदिर बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे हजारे यांची भेट घेऊन मंदिर उघडण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती केली होती.

मंदिर बचाव समितीच्या या आंदोलनाला पाठिंबा देत अण्णा हजारे म्हणाले होते कि, “सध्या दारूची दुकानं, हॉटेल्स उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. तेथेही मोठय़ा प्रमाणावर गर्दी होते. या गर्दीमुळे करोना संसर्ग पसरत नसेल तर मंदिरं उघडल्याने संसर्ग कसा होईल?”, असा सवालही अण्णा हजारे यांनी केला होता.

हे वाचले का?  Maharashtra Election 2024 : यवतमाळमध्ये महायुती वर्चस्व कायम राखणार का ?