अदाणी उद्योग समूहाकडून २.१५ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची मुदतपूर्व परतफेड!
गेल्या महिन्याभरापासूने भारतीय शेअर मार्केटमध्ये अदाणी समूहाची घसरण आणि खालावत चाललेली पत हा चर्चेचा विषय ठरला आहे. हिंडेनबर्ग रीसर्चच्या अहवालानंतर खुद्द गौतम अदाणी यांची जागतिक श्रीमंतांच्या यादीत मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आंतरराष्ट्रीय पातळीवर अदाणी समूहाची विश्वासार्हता पणाला लागलेली असताना आता गौतम अदाणी आणि त्यांच्या प्रमोटर्सकडून उपाययोजनांसाठी मोठी पावलं उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अदाणी समूहीवरील कर्जभार कमी करण्यासाठी मुदतपूर्वी कर्जफेड करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार आता अदाणींनी तब्बल २.१५ अब्ज डॉलर्सची परतफेड केली आहे.
रविवारी अदाणी समूहाकडून यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, समूहातील प्रमोटर्सचे शेअर्स गहाण ठेवून उभारण्यात आलेलं २.१५ अब्ज डॉलर्सचं कर्ज समूहाकडून मुदतपूर्व फेडम्यात आलं आहे. यामध्ये अदाणी समूहातील इतर कंपन्यांच्या प्रमोटर्सचाही समावेश आहे. यामुळे अदाणी समूहाकडून तारण ठेवण्यात आलेले प्रमोटर्सचे सर्व शेअर्स कर्जमुक्त झाल्याचंही समूहाकडून जाहीर करण्यात आलं आहे.
३१ मार्चची मुदत
दरम्यान, अदाणी समूहाला अशा प्रकारे शेअर्सवर उभारलेलं कर्ज फेडण्यासाठी ३१ मार्चची मुदत देण्यात आली होती. एकूण २.६५ अब्ज डॉलर्सचं कर्ज फेडण्याचे निर्देश अदाणी समूहाला देण्यात आले होते. मात्र, ३१ मार्चपूर्वीच हे सर्व कर्ज फेडण्यात आल्याचं आदाणी समूहाकडून जाहीर करण्यात आलं आहे. “हे सर्व कर्ज फेडण्याची मोहीम अवघ्या ६ आठवड्यात पूर्ण करण्यात आली आहे. यातून हेच स्पष्ट होतं की अदाणी समूहाची आर्थिक बाजू भक्कम असून गुंतवणूकदारांचाही अदाणी समूहावर विश्वास कायम आहे”, असं समूहाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात नमूद केलं आहे.
दरम्यान, याचवेळी अदाणी समूहाच्या प्रमोटर्सकडून अम्बुजा सिमेंटच्या खरेदीसाठी उभारण्यात आलेलं ५०० मिलियन डॉलर्सचं कर्जही मुदतपूर्व फेडण्यात आल्याचं नमूद केलं आहे.