अदानी समूहाकडून ३४,९०० कोटींचा प्रकल्प स्थगित

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या समभागांचे बाजारमूल्य मोठय़ा प्रमाणात घसरल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पीटीआय, नवी दिल्ली : अदानी समूहाने गुजरातमधील मुंद्रा येथील ३४,९०० कोटींच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पाचे काम थांबवले. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या समभागांचे बाजारमूल्य मोठय़ा प्रमाणात घसरल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. गुंतवणूकदारांच्या चिंता दूर करण्यासाठी आणि समूहात स्थैर्य आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात मुंद्रा येथील अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन येथे ग्रीनफिल्ड कोळशापासून पीव्हीसी तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी अदानी एंटरप्राइजेस लिमिटेडने मुंद्रा पेट्रोकेमिकल लिमिटेड ही उपकंपनी स्थापन केली होती. हिंडेनबर्ग अहवालामुळे बसलेल्या धक्क्यानंतर कंपनीने काही कर्जाची परतफेड, कंपनीच्या कामात स्थैर्य आणि आरोपांना उत्तर देणे या उपाययोजनेने गुंतवणूकदारांच्या चिंता दूर करण्याचे धोरण अवलंबले आहे.

हे वाचले का?  Lal Krishna Advani : लालकृष्ण आडवाणी, टेनिसची मॅच आणि संघाचं सदस्यत्व! काय आहे ‘तो’ रंजक किस्सा?

त्याचाच एक भाग म्हणून रोख पैशांची आवक आणि उपलब्ध वित्तसहाय्य यांच्या आधारे सर्व प्रकल्पांचे पुनर्मुल्यांकन केले जात आहे. मुंद्रा पेट्रोकेमिकल प्रकल्पामध्ये दरवर्षी १० लाख टन हरित पीव्हीसी निर्मिती केली जाणार होती, आता तो प्रकल्प सध्या थांबवण्यात आला आहे. या प्रकल्पाची अपेक्षित निर्मिती क्षमता दरवर्षी २,००० किलो टन पीव्हीसी इतकी आहे आणि त्यासाठी दरवर्षी ३१ लाख टन कोळसा आवश्यकता होती. हा कोळसा ऑस्ट्रेलिया, रशिया आणि इतर देशांकडून आयात केला जाणार होता.

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!

उत्तम आर्थिक स्थितीचा दावा

कंपनीने संबंधित विक्रेते आणि पुरवठादार यांना ईमेलद्वारे पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व कामकाज तातडीने थांबवण्यास सांगितले आहे. आमच्या प्रत्येक स्वतंत्र पोर्टफोलियो कंपनीचा ताळेबंद मजबूत आहे, असा दावा समूहाच्या प्रवक्त्यांनी केला आहे. समूहाकडे आघाडीची प्रकल्प विकास आणि अंमलबजावणीसाठी आवश्यक क्षमता, उत्तम प्रशासन, सुरक्षित मालमत्ता, रोख रकमेची आवक आहे आणि आमच्या व्यवसाय योजनांसाठी पूर्ण निधी उपलब्ध आहे, असे प्रवक्त्यांनी सांगितले. आमच्या भागधारकांसाठी संपत्ती निर्मितीची आधी आखून घेतलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्यावर आमचे लक्ष एकवटलेले आहे असे ते म्हणाले.

हे वाचले का?  रतन टाटा यांच्या निधनामूळे वरसोली गावावर शोककळा; जाणून घ्या काय होते रतन टाटांचे अलिबाग मधील वरसोली कनेक्शन