अनाथांचा आधारवड

संस्था चालवायची असेल तर कोणी तरी पूर्ण वेळ झोकून देऊन काम करावे लागते.

हजारोंचे बळी घेणाऱ्या लातूर-उस्मानाबादच्या भूकंपाने काही सामाजिक प्रश्नही जन्मास घातले. त्यातलाच एक भूकंपामुळे अनाथ झालेल्या मुलांचा. त्यांचा सांभाळ कोणी करायचा, असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा ‘आपलं घर’ संस्था आकारास आली. संस्थेने या मुलांबरोबरच कालांतराने विविध कारणांनी अनाथ होणाऱ्या शेकडो मुलांना मायेची ऊब दिली. जीवनमूल्ये रुजविण्याबरोबरच समाजभान देणारे उपक्रम राबविणारी संस्था म्हणून तिची ओळख आहे.

भूकंपाच्या घटनेला २८ वर्षे झाली. १५ हजार जणांचे मृत्यू झाले. घरे होत्याची नव्हती झाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना काढण्यापासून ते त्यांचे पुनर्वसन करण्याचे प्रश्न लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पुढची पाच-सात वर्षे सुरू होते. पायाभूत सुविधांपासून ते नवीन घरे बांधण्यापर्यंतचे पुनर्वसन राज्य सरकारने अगदी नेटाने पूर्ण केले. पण, या काळात एक संवेदनशील प्रश्न सर्वांसमोर होता. भूकंपामुळे अनाथ झालेली मुले कोणी सांभाळायची? काही संघटनांनी मुलांना अन्य शहरात हलविण्याचा सपाटा लावला होता. त्याला स्थानिकांचा विरोध होता. ही मुले अशी बाहेर गेली तर त्यांच्या वाडवडिलांची शेतीवाडी, नातेवाईक यांचा संबंधच संपून जाईल, असे मत तेव्हा मांडले जाई. हा प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासमोर चर्चेत आला. तेव्हा अर्थातच समस्या सोडवण्यासाठी राष्ट्र सेवा दलाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सुचविले. तेव्हा राष्ट्र सेवा दलाच्या अध्यक्षस्थानी पन्नालाल सुराणा होते. या चर्चेनंतर ‘आपलं घर’ या संस्थेची सुरुवात झाली. गेल्या २८ वर्षांत या संस्थेतून जवळपास १ हजार ६५० हून अधिक मुले १० उत्तीर्ण झाल्यानंतर बाहेर पडली. कोणी छोट्या- मोठ्या नोकऱ्या केल्या तर कोणी व्यवसाय उभे केले.

संस्था चालवायची असेल तर कोणी तरी पूर्ण वेळ झोकून देऊन काम करावे लागते. त्याला स्थानिक पातळीवरही पाठिंबा लागतो. तेव्हा अंगणवाडीसाठी म्हणून नोंदल्या गेलेल्या ज्ञानदीप कलोपासक मंडळाला बरोबर घेत नगरपालिकेच्या जागेत अनाथ मुलांचा सांभाळ सुरू झाला. या काळात परदेशी संस्थांकडून मोठी मदत मिळत असे. कॅलिफोर्नियात काम करणाऱ्या ‘चॅरिटेबल केअर फाऊंडेशन’ यासंस्थेने ‘आपलं घर’साठी १४ खोल्यांचा पहिला मजला बांधून दिला. याच काळात ‘लोकसत्ता’कडून ५६ लाख रुपयांच्या मदतीतून दुसरा मजला बांधण्यात आला. संस्थेसाठी एक ट्रॅक्टरही देण्यात आला. संस्थेचे काम पुढे स्थिरावत जाईल, अशी अशा निर्माण झाली. या काळात अन्य माध्यम संस्थांनीही मदत केली. कोणी भोजनगृह बांधून दिले तर कोणी विश्राम करता येईल अशा खोल्या बांधल्या. संस्थेचा डोलारा वाढता राहिला. भूकंपात अनाथ झालेल्या मुलांवरील संकट टळले. त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मिटला. पण, समाजात विविध कारणांनी अनाथ होणाऱ्या मुलांसाठी हे काम सुरू ठेवण्याचा निर्णय राष्ट्र सेवा दलाने घेतला. गरजू, अडचणीतील मुले ‘आपलं घर’मध्ये येत राहिली. संस्थेचा कारभार पाहणारी कार्यकर्त्यांची फळी निङ्मस्वार्थपणे काम करत राहिली. पण मुलांची संख्या आणि त्यांचा दैनंदिन खर्च मात्र दिवसेंदिवस अडचणीचा होत गेला. शासनाच्या सहायक अनुदान देण्याच्या प्रक्रियेत गेल्या काही वर्षांत कमालीचा घोळ झाला. अचानकपणे अनाथांची संख्या वाढवून अनुदानावर चारचाकी गाड्या घेण्यापर्यंत काही संस्थाचालकांची मजल गेली. मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्थांचाही बाजार झाला. त्यात कोणाचे काम चांगले, कोण निङ्मस्पृह सेवा करतात, याची माहिती घेऊन त्यांना सरकारी मदत मिळायलाच हवी, असा प्रशासकीय दृष्टिकोन असणारे अधिकारी कमी होत गेले. पुढे कागदाचे गुंते वाढवत अनुदानाची रक्कम २५ लाखांपर्यंत थकली. आता सरकार दरबारी हे प्रकरण जुनं आहे, यात काही मिळणार नाही असंही सांगितलं जातं. सेवा दलाच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते सरकारी कार्यालयात चकरा मारत राहतात. एवढेच नाही तर हा निधी मिळविण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा यांनी उपोषणही केले. पण यंत्रणेचा निर्ढावलेपणा काही कमी झाला नाही. आता मुलांना जगवायचे असेल तर पुन्हा मदतीचे हात लागतील अशी स्थिती निर्माण झाली. संस्थेचा कारभार पहिल्या दिवशीपासून पाहणारे पन्नालाल सुराणा वयाच्या ८९व्या वर्षी राज्यातील विविध शहरांतून देणगी मिळविण्यासाठी प्रवास करत राहतात. संस्थेची कार्यशैली ही केवळ अनाथांचे संगोपन एवढ्यापुरती मर्यादित नाही. सेवा दलातील कार्यकर्ते जातिभेद निर्मूलन, धर्मनिरपेक्षता ही जीवनमूल्ये मुलांपर्यंत पोहोचवत राहतात. अंधश्रद्धा निर्मूलनापासून ते लिंगभाव समानतेपर्यंतचे समाजभान देण्यापर्यंतचे काम करणारी संस्था अशी ‘आपलं घर’ची ओळख राज्यभर आहे. त्याचे अन्य संस्थांच्या कार्यशैलीवरही परिणाम जाणवत राहतात. उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळा, शहरातील स्वाधार मतिमंद मुलींचे वसतिगृह ही त्याची उदाहरणे. जिल्हाभरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची एकजूट राहावी, संस्थेच्या कामासाठी आवश्यक मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रशिक्षणे व्हावीत असे उपक्रम ‘आपलं घर’ या संस्थेत नेहमी सुरू असतात. खरे तर संस्थेतून शिकून अनेकांनी स्वत:चा व्यवसाय वाढविला. गुंडू पवार नावाचा कार्यकर्ता ‘आपलं घर’मधून शिकल्यानंतर उस्मानाबादी शेळी पालन, प्रशिक्षण आणि विक्री व्यवहारात आहे. ते आता ‘आपलं घर’चेही विश्वस्त आहेत. मालमोटारीच्या व्यवसायातील गैसोद्दीन शेख यांच्याही ४० हून अधिक मालमोटारी वाहतूक व्यवसायात आहेत. संस्थेतून बाहेर पडलेले कार्यकर्तेही आर्थिक स्वरूपाची मदत करत असतात. पण, संस्थेचा कारभार ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर चालतो ते अजूनही तुटपुंज्या मानधनावरच काम करतात. तसेच मुलांच्या भोजनासाठी खर्च, कपडे, दैनंदिन वस्तू यासाठी लागणारा वाढता खर्च भागविण्यासाठी दात्यांची गरज आहे.

हे वाचले का?  Ganesh Visarjan Procession : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ

नगरपालिकेच्या जागेतील प्रकल्प मूळ जागेत हलवा, असे कळविल्यानंतर पत्र्याच्या शेडमध्ये ३०० मुले राहण्यास आली. एके दिवशी पत्रेही उडून गेले. ते दोन दिवस सारे जण उघड्यावर होते. पुढे इमारत उभी राहिली. पण, संकटानंतर अधिक चांगले घडवून आणण्यासाठी समाज मदत करतो हा अनुभव संस्थेतील कार्यकर्त्यांना आहे. अशीच स्थिती करोनाकाळातील टाळेबंदी लागण्यापूर्वीही होती. गेल्या वर्षी मार्च महिन्यात टाळेबंदी लागण्यापूर्वी केवळ दहा दिवस पुरेल एवढेच धान्य होते. मदतीसाठी बाहेर कुठे जायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. प्रत्येकाला जीवाची भीती होती. अशा काळात संस्थेने प्रकल्पाशेजारील ग्रामपंचायतींना धान्य देण्याची विनंती केली. कलदेव निंबाळा, भोसगा, येणेगुर यासह विविध ग्रामपंचायतींनी ८० क्विंटल धान्य उपलब्ध करून दिले. त्यामुळे ही मुले उपाशी राहणार नाहीत, याची खात्री सर्वांना पटली. पण स्थायी स्वरूपात ही समस्या सोडवावी यासाठी आता मदतीची गरज आहे.

हे वाचले का?  मनोज जरांगे यांच्या शांतता फेरीवर काळ्या झेंड्यांचे सावट

ही संस्था मोठी व्हावी, त्यात कमीत कमी अडचणी याव्यात म्हणून अनेक वर्षे परिश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक मोठी फळी उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यात कार्यरत आहे. त्याचबरोबर राष्ट्र सेवा दलाचे पाठीराखेही मदत करत असतात. सदानंद वर्दे, लातूरमधील वासुदेवराव बेंबळकर, जीवनधर शहरकर, जनार्दन वाघमारे, सोलापूरमधील श्रीराम पुजारी, दत्ता गायकवाड ही मंडळी संस्थेच्या कारभारात प्रारंभी लक्ष घालीत. आजही अनेक कार्यकर्ते मदत करत असतात. अनाथ मुलांचा सांभाळ करताना त्यांच्यात नव्या जाणिवेचे मूल्य रुजावीत म्हणून कार्यरत असणाऱ्या या प्रकल्पास आता नव्याने सहकार्याची गरज आहे. पन्नालाल सुराणा यांच्यासारख्या विचारी आणि निर्मोही व्यक्तिमत्त्वाच्या मार्गदर्शनाखाली आणि दैनंदिन देखरेखीखाली आजही अनाथ आणि ज्यांचे कोणी नाही त्यांना ‘आपलं घर’ आधार देत आहे. आपणही त्यात सहभागी होऊ या…!

हे वाचले का?  गणेशोत्सवातील ‘शिधा’ नवरात्रीत; दिवाळीत ‘आनंदा’ला तोटा!

   -सुहास सरदेशमुख

संस्थेपर्यंत कसे जाल?

राष्ट्रीय महामार्ग क्र.९ वर नळदुर्ग किल्ल्याच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर उमरगा शहराकडे जाताना दोन किलोमीटरवर ही संस्था आहे. किल्ल्याच्या बाजूने जाणारी नदी ओलांडली की, वळणावरच्या रस्त्यावर ‘आपलं घर’ दिसतं.

राष्ट्र सेवा दल आपलं घर  Rashtra Seva dal Aple Ghar या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा.

संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र आहे.

धनादेश येथे पाठवा… : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस,

प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४.  ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय       

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१

दिल्ली कार्यालय       

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००