…अन् दरेवाडीची शाळा पुन्हा गजबजली

प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी शाळेला भेट दिली. शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्याने शाळा पुन्हा एकदा गजबजली.

नाशिक – शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीकडे लक्ष वेधण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आणि विस्थापित असणाऱ्या दरेवाडी या गावातील २५ हून अधिक विद्यार्थ्यांनी बकऱ्यांसह जिल्हा परिषदेवर धडक दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिक्षण अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी दरेवाडीला भेट देत शाळा पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिल्याने शाळा विद्यार्थ्यांनी पुन्हा गजबजली.

इगतपुरी तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या दरेवाडी येथे जिल्हा परिषदेची शाळा महिन्यापासून गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे बंद आहे. ऑगस्ट महिन्यात गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा समायोजित करण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे गावात असलेली शाळा गावाबाहेर जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शाळा बंद करू नका, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा आंदोलनाची हाक दिली होती. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत दरेवाडी येथील २५ हून अधिक बालके दप्तर घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे पायी निघाली होती. आमची शाळा कार्यालयात भरू द्या, अन्यथा आहे तेथेच सुरुराहू द्या, अशी मागणी करण्यात आली होती.

हे वाचले का?  मनोज जरांगे यांच्या शांतता फेरीची नाशिकमध्ये तयारी

शिक्षणाधिकाऱ्यांनी या बालकांना रस्त्यातच थांबवित शाळा बंद न करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आठवड्याभरात शाळा समायोजित करण्याचा आदेश दिला. यामुळे संतप्त पालकांनी तेथील शिक्षकांना मारहाण केली. शिक्षकांना मारहाण केल्यामुळे शाळा पुन्हा बंद पडली. महिन्याभरापासून शाळा बंद आहे. ही शाळा पुन्हा नियमित सुरू करावी, या मागणीसाठी मंगळवारी विद्यार्थी पुन्हा एकदा प्रशासनाच्या दारी आले. ही बालके दप्तर घ्या, बकऱ्या द्या, हे गाऱ्हाणं प्रशासनाला घालण्यासाठी सामााजिक कार्यकर्त्यांसोबत या बालकांनी वाहनातून नाशिक गाठले. शहरातील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून ही बालके जिल्हा परिषदेवर बकरी, दप्तरासह धडकली. प्रवेशद्वारावर बालकांनी ठिय्या दिला. प्रशासनाच्या वतीने शाळा बंद ठेवणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देण्यात आले. बुधवारी सकाळी प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी शाळेला भेट दिली. शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्याने शाळा पुन्हा एकदा गजबजली.

हे वाचले का?  मुसळधार पावसाचा ३८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका; चांदवड, देवळा, पेठमध्ये सर्वाधिक नुकसान