शैक्षणिक वर्षांत पुस्तकं बदलणार अशी अफवा आली की नेमकं काय होतं ही खंत एका पुस्तक विक्रेत्यानेच मांडली आहे.
मयुरेश गद्रे
शाळेत शिकणाऱ्या सर्व मुलांच्या पालकांसाठी शालेय पाठ्यपुस्तकं हा जिव्हाळ्याचा विषय असतो , शिक्षकांसाठी असतो , आणि खरंतर आमच्या सारख्या पुस्तक विक्रेत्यांसाठी देखील तो तितकाच महत्त्वाचा विषय असतो . कारण आमचं पोट त्यावर अवलंबून असतं.
पुढच्या शैक्षणिक वर्षी कोणती पुस्तकं बदलणार याचं परिपत्रक यावर्षी शालेय पुस्तकांच्या हंगामापूर्वी येणं अपेक्षित असतं . त्यानुसार आम्ही यंदाच्या वर्षी आमची खरेदी नियंत्रित करावी आणि आमचं नुकसान टाळावं हा हेतू त्यामागे असतो . कारण पुस्तकं ( अभ्यासक्रम ) बदलली की त्यावर आधारित गाईड्स , व्यवसाय (workbooks ) , ‘मास्टर की’ असं सगळं बदलतं . जे काही स्टॉक रूपाने उरतं ते सगळं आठ-दहा रुपये किलो या दराने रद्दीत घालावं लागतं . बालभारती तर्फे हा संकेत वर्षानुवर्षे पाळला जात होता . मात्र खेदाची बाब अशी की अलीकडे याबाबतीत शासकीय नोकरशाहीची सर्वव्यापी असंवेदनशीलता “बालभारती” याही उपक्रमाला लागू झाली आहे.
मागील वर्षी काय बदल झाले?
गेल्या वर्षी बालभारती तर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व पुस्तकांचं स्वरूप बदलण्यात आलं . संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम एका पुस्तकात , अशी प्रत्येक विषयाची वेगवेगळी पुस्तकं आपण वापरत होतो . गेल्या वर्षी यात मूलगामी बदल करण्यात आला . आणि चार भाग असलेली एकात्मिक पुस्तकं तयार करण्यात आली . म्हणजे एकाच पुस्तकात थोडं मराठी , थोडं गणित , थोडा इतिहास , थोडा भूगोल, विज्ञान, इंग्रजी असे सगळे विषय एकत्रित करून त्याचं एक पुस्तक. वर्षभराच्या अभासक्रमाची अशी चार पुस्तकं झाली. थोडक्यात काय तर रोज एकच पुस्तक घेऊन शाळेत जायचं. ज्या विषयाचा तास असेल त्या विषयाचं पान उघडायचं अशी नवीन पद्धत आली . दप्तराचं ओझं आपोआपच कमी झालं असं सगळं छान सुरू झालं. आता यंदाचं नवीन शालेय वर्ष अगदी जवळ आलं आहे . आठ दिवसात शाळा सुरू होतील . पण सध्या एक नवीन समस्या जाणवत आहे म्हणून हा लेखनप्रपंच !
प्रस्तावित आराखडा जाहीर होणं हा प्रक्रियेचा भाग
गेल्या आठवड्यात शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता तिसरी ते आठवीच्या नवीन पुस्तकांचा प्रस्तावित आराखडा जाहीर करण्यात आला . त्यावर नेहेमीप्रमाणे नागरिकांच्या हरकती , सूचना मागविण्यात आल्या. ही एक रुटीन प्रक्रिया आहे . पण त्यावर अनेक माध्यमातून असं चित्र उभं केलं गेलं की यंदा तिसरी पासूनची सर्वच पुस्तकं बदलणार. आजच्या काळात एखाद्या बातमीचा कसा विपर्यास होऊ शकतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे .
नेमका बदल कधी होणार आहे?
खरंतर शासकीय निर्णयानुसार पुढच्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये फक्त इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरीची पाठ्यपुस्तकं बदलणार आहेत . तसं परिपत्रक मार्चमध्ये आम्हाला आलं होतं . गेल्या आठवड्यात जो मसुदा अवलोकनार्थ प्रसिद्ध केलाय ते बदल प्रत्यक्षात २०२६ मध्ये लागू होईल . पण इतकं खोलात जाऊन अभ्यास करण्याची , त्यासाठी मूळ मुद्दा समजून घेण्याची गरज ना बातमीदारांना वाटते ना ती प्रसिद्ध करणाऱ्यांना ! त्यामुळे पालकांमध्ये मात्र गोंधळाचं वातावरण तयार होतं आणि त्याचा नाहक त्रास आम्हाला भोगायला लागतो . लगेच पालकांनी खरेदी थांबवली आणि दुकानांत येऊन शंका विचारायला सुरुवात झाली.
तर मंडळी, यंदा महाराष्ट्र पाठयपुस्तक मंडळाची कोणतीही पुस्तकं बदलणार नाहीत पुढच्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये पहिली आणि दुसरीची पुस्तकं बदलतील त्यापुढच्या वर्षाची काळजी करत आपल्या डोक्याला अजिबात त्रास करुन घेऊ नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि हो, इतर कुणालाही पाठ्यपुस्तकांबद्दल प्रश्न विचारण्यापेक्षा आमच्यासारख्या पुस्तकविक्रेत्यांना विचारा.
(मयुरेश गद्रे, ब्लॉगचे लेखक ‘गद्रे बंधू बुक स्टोअर’ हे डोंबिवली येथील सुप्रसिद्ध दुकान चालवतात.)