‘अमृत’ संस्थेचे कार्यालय पुण्याला हलवल्यावरुन छगन भुजबळ संतापले; म्हणाले, “या सरकारला तर…”

नाशिकबाबत सरकारला एवढा दुस्वास का आहे? असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी शिंदे सरकारला केला आहे

राज्यातील शिंदे सरकारने ‘अमृत’ या संस्थेचे कार्यालय नाशिकहून पुण्याला हलवले आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सरकारवर टीका केली आहे. ‘सरकारला कार्यालये हलवण्याशिवाय दुसरे कुठलेही काम उरले नाही’ असे म्हणत भुजबळ यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकमधील सर्व महत्वाची कार्यालये दुसऱ्या शहरात हलवण्यात येत असल्याचा मुद्दा अधिवेशनात मांडणार असल्याचे भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हे वाचले का?  दिवाळीत भेसळ रोखण्यासाठी, अन्न औषध प्रशासन विभाग सज्ज

“याआधी नाशिकचे वनविभागाचे कार्यालय नागपूरला स्थलांतरीत केले, महावितरणचे कार्यालय दुसरीकडे हलवण्यात आले, आता ‘अमृत’चे मुख्यालयही दुसऱ्या शहरात सरकारने हलवले आहे. सरकार हे कशासाठी करत आहे हेच कळत नाही” असे भुजबळ म्हणाले. नाशिकबाबत सरकारला एवढा दुस्वास का आहे? असा सवाल देखील त्यांनी केला. सरकारला नाशिकच्या जनतेची मतं पाहिजे आहेत. त्यांना या शहराची महानगरपालिका ताब्यात घ्यायची असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुण-तरुणींसह इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी ‘महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी’ म्हणजेच ‘अमृत’ या संस्थेची सरकारकडून निर्मिती करण्यात आहे. महाविकासआघाडी सरकारने या संस्थेचे मुख्यालय नाशिकला मंजूर केले होते.

हे वाचले का?  नाशिकमध्ये दुकानाला आग, वरच्या मजल्यावरील रुग्णालय सुरक्षित

राज्यातील बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर ‘अमृत’ या स्वायत्त संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सर्वेक्षणे करणे, स्वयंरोजगार आणि इतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उदयोग आणि व्यवसायासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचे काम ही संस्था करते.

हे वाचले का?  Nashik Rain : नाशिकमध्ये सरासरीच्या ९२.०४ टक्के पाऊस