अमेरिकेचं कायमस्वरूपी नागरिकत्व स्वीकारणाऱ्या नागरिकांमध्ये सर्वात वरचा क्रमांक मेक्सिकोचा असून दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे.
२०२२ या एका वर्षात तब्बल ६६ हजार ९६० भारतीयांनी अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलं असल्याची बाब समोर आली आहे. अमेरिकेत मेक्सिकोमधील सर्वाधिक नागरिक असून त्याखालोखाल आता दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेतील भारतीयांचा उल्लेख नुकत्याच जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीमध्ये आहे. सीआरएसकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. बिझनेस स्टँडर्डनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
अमेरिकेत दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या भारतीयांची
CRS रिपोर्टनुसार अमेरिकेत २०२२ च्या आकडेवारीनुसार १ लाख २८ हजार ८७८ मेक्सिकन नागरिक असून दुसऱ्या क्रमांकावर ६५ हजार ९६० भारतीयांचा समावेश आहे. या यादीत तिसऱ्या स्थानी फिलिपीन्स (५३,४१३ नागरिक), क्युबा (४६,९१३), डॉमिनिकन रिपब्लिक (३४,५२५), व्हिएतनाम (३३,२४६) आणि चीन (२७,०३८) या देशांचा समावेश आहे. या आकडेवारीनुसार, अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपैकी १४ टक्के अर्थात ४ कोटी ६० लाख लोकसंख्या विदेशातून अमेरिकेत स्थायिक झाली आहे.
२०२३ पर्यंत अमेरिकेतील भारतीयांची संख्या २८ लाखांवर
दरम्यान, CSR च्या आकडेवारीनुसार, २०२३पर्यंत अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांची एकूण संख्या तब्बल २८ लाख ३१ हजा ३३० इतकी आहे. मेक्सिकोची संख्या १ कोटी ६ लाख ३८ हजार ४२९ इतकी आहे. तर चीनमधील नागरिकांची संख्या २२ लाख २५ हजार ४४७ इतकी आहे.
४२ टक्के भारतीय नागरिकत्वासाठी अपात्र
या आकडेवारीतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सध्या अमेरिकेत असणाऱ्या एकूण भारतीयांपैकी तब्बल ४२ टक्के भारतीय हे अमेरिकेचं कायमस्वरूपी नागरिकत्व मिळवण्यासाठी अपात्र ठरले आहेत. त्यामुळे हे सर्व नागरिक सध्या तात्पुरत्या व्हिसावर अमेरिकेत वास्तव्य करत आहेत.