उद्योगांचा करोनाविषयक कृतिगट नेमण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना
उद्योगांचा करोनाविषयक कृतिगट नेमण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना
मुंबई : करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अर्थचक्र थांबू नये, उद्योगांच्या उत्पादनावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी कृतिगट (टास्क फोर्स) स्थापन करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या यंत्रणेमार्फत भारतीय उद्योग महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी (सीआयआय) संवाद साधताना उद्योग क्षेत्राचा आढावा घेतला.
संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने विविध स्तरांवर तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्राणवायू उत्पादन, साठा यांचे नियोजन तसेच उद्योगांतील कामगार-कर्मचारी यांचे मोठय़ा प्रमाणावर लसीकरण, उत्पादनावर परिणाम होऊ न देणे, कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती निवास व्यवस्था, कामाच्या वेळा आदी विषयांवर मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी चर्चा केली. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते. सीआयआयचे पदाधिकारी बाबा कल्याणी, उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, अनंत गोएंका, शरद महिंद्रा आदी उद्योगपती या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
राज्यात सध्या सुमारे १३०० मेट्रिक टन प्राणवायूचे उत्पादन केले जाते. आगामी काळात करोनाचे आव्हान अधिक वाढले तर प्राणवायूची मागणी दुसऱ्या लाटेपेक्षाही वाढेल आणि त्यामुळे टंचाईही भासू शकते. त्यामुळे प्राणवायू निर्मितीबरोबरच त्याचा मोठय़ा प्रमाणावर साठा करून ठेवणे महत्वाचे असूऩ, त्यासाठी टाक्या, सिलिंडरची आवश्यकता भासणार असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
छोटय़ा -मोठय़ा उद्योगांमध्ये करोनापासून प्रादुर्भाव होऊ न देणारी यंत्रणा निर्माण करून त्यामाध्यमातून आरोग्याचे नियम पाळून सुरक्षित उत्पादन सुरू ठेवता आले पाहिजे. काटेकोर निर्बंध लागू करावे लागल्यास उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून कामगारांच्या निवासासाठी कंपनीच्या परिसरात किंवा जवळपास निवास व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. कामांच्या ठिकाणी गर्दी होणार नाही व कुठल्याच सुविधेवर ताण येणार नाही हे पाहावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सूचविले. ‘डेल्टा प्लस’ या करोनाच्या उत्परीवर्तीत विषाणूमुळे अधिक काळजी घ्यावी लागणार असून, अनेक देशांनी पुन्हा निर्बंध लागू करण्यास सुरूवात केली आहे. आणखी काही महिने तरी आपल्याला मुखपट्टी नियमित वापरणे, हात सातत्याने धूत राहणे, अंतर पाळणे याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे लागणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी उद्योगांच्या प्रतिनिधींनीही करोनाकाळात राज्य शासनाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे तसेच उद्योगांच्या परिसरात करोना सुसंगत वर्तणूक राहील, याची काळजी घेण्याची ग्वाही दिली.
कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर भर
’उद्योगांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोठय़ा प्रमाणावर करून घ्यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
’आजमितीस केंद्राने दिलेला
२५ लाख मात्रांचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. तो मोठय़ा प्रमाणावर वापरला गेला पाहिजे.
’ त्यासाठी उद्योगांनी खासगी रूग्णालयांशी चर्चा करून आपल्या कामगारांचे लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.