“आता पुन्हा आसामला जाऊन नवस करणार का?” संजय राऊतांचा एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल, सीमावादावरून टीका!

संजय राऊत म्हणतात, “कन्नड वेदिकेचे लोक आपले झेंडे लावतात हे महाराष्ट्र सरकारमधल्या काही लोकांचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय…!”

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा चिघळू लागला असून यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही चालू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील गावांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे हे वातावरण तापलं असताना कर्नाटकने जतमधील ४० गावांवर दाना करण्याची तयारी केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे यावरून महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज्यातलं विद्यमान सरकार यावर कोणतंही पाऊल उचलत नसल्याची टीका विरोधकांनी सुरू केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात आज माध्यमांशी बोलताना शिंदे सरकारवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं.

हे वाचले का?  Maharashtra News Live : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, भेटीचं कारण काय? राजकीय चर्चांना उधाण

“सरकारमधल्या लोकांच्या छुप्या पाठिंब्याशिवाय शक्य नाही”

जत तालुक्यातील उमराडी गावात कन्नड वेदिका संघटनेच्या काही लोकांनी झेंडे फडकवल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता संजय राऊतांनी त्यासाठी शिंदे सरकारला जबाबदार धरलं. “याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काय वाटतं हे त्यांना विचारायला हवं. ज्या दोन मंत्र्यांना सीमाभागासंदर्भातलं काम दिलंय ते चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे तीन तारखेला बेळगावला चालल्याचं मी वाचलं. कन्नड वेदिकेचे लोक महाराष्ट्रात येतात, हे कर्नाटक सरकारच्या पाठिंब्याशिवाय येऊ शकत नाहीत. ते आपले झेंडे लावतात हे महाराष्ट्र सरकारमधल्या काही लोकांचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय होऊ शकत नाही. हे असं घडलं असेल, तर राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली पाहिजे”, असं संजय राऊत म्हणाले.

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल

“तुम्ही पुन्हा गुळमुळीत धोरण स्वीकारून हात चोळत बसणार आहात, दिल्लीकडे बघत बसणार आहात की त्या गावातून झेंडे लावायला घुसलेल्या लोकांना घालवण्यासाठी पुन्हा आसामला जाऊन नवस करणार आहात हे एकदा सांगा”, अशा शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.