“आता फक्त ISIS चा प्रस्ताव…”, नितेश राणेंचा राज्य सरकारवर खोचक शब्दांत टोला!

नितेश राणे म्हणतात, “वाह, एमआयएमचीही महाविकास आघाडीमध्ये येण्याची तयारी. खरंच करून दाखवलं!”

गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानं विजय मिळवल्यानंतर राज्यात देखील आत्तापासूनच निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी एकीकडे २०२४मध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला असताना दुसरीकडे राज्यात नवी सत्तासमीकरणं तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एमआयएमनं महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. राजकीय वर्तुळात यावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावला आहे.

हे वाचले का?  शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता

“खरंच करून दाखवलं…!”

नितेश राणेंनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. “वाह..एमआयएमचीही महाविकास आघाडीमध्ये येण्याची तयारी. कट्टरपंथींना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे. आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे. खरंच करून दाखवलं”, असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.

संजय राऊतांनी फेटाळली युतीची शक्यता

एकीकडे एमआयएमनं युतीसाठी महाविकास आघाडीसमोर हात पुढे केला असताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. “महाराष्ट्रात तीन पक्षांचच सरकार राहील. राज्यातले तीन सत्ताधारी पक्ष शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारानं चालणारे पक्ष आहेत. ते आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकतात, ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत. त्यामुळे या युतीच्या अफवा आहेत”, असं राऊत म्हणाले आहेत.

हे वाचले का?  Maharashtra News Live : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, भेटीचं कारण काय? राजकीय चर्चांना उधाण