करोनाच्या संकटात प्रशासनाने विवाह, स्वागत सोहळ्यासारख्या कार्यक्रमांतील गर्दीवर अंकुश ठेवण्यासाठी वऱ्हाडींची संख्या ५० इतकीच मर्यादित ठेवलेली आहे.
मुखपट्टी आणि सुरक्षित अंतरपथ्याकडे दुर्लक्ष
नाशिक : करोनाच्या संकटात प्रशासनाने विवाह, स्वागत सोहळ्यासारख्या कार्यक्रमांतील गर्दीवर अंकुश ठेवण्यासाठी वऱ्हाडींची संख्या ५० इतकीच मर्यादित ठेवलेली आहे. सुरक्षित अंतराचे पथ्य व वेळेची मर्यादाही निश्चित आहे. नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महापालिका, पोलीस प्रशासन कारवाई करते. तथापि, हे नियम बहुदा केवळ सामान्यांसाठी असावेत.
लोकप्रतिनिधी व त्यातही सत्ताधारी पक्षातील व्यक्तींना मात्र ते लागू नसल्याचे गुरुवारी राष्ट्रवादीचे आमदार माणिक कोकाटे यांच्या कन्येच्या विवाह स्वागत सोहळ्यात उघड झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ, दत्ता भरणे, सुनील केदार अशा मंत्र्यांसह अनेक लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली. सोहळ्यात गर्दी झाली. मुखपट्टी, सुरक्षित अंतराचे पथ्य बाजूला पडले.
सिन्नर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार माणिक कोकाटे यांची कन्या तथा जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी यांचा विवाह सोहळा नोंदणी पद्धतीने पार पडला. यानिमित्त गंगापूर गावालगतच्या रेसिडिंग वॉटर रिसॉर्ट येथे दिमाखदार स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. करोनाच्या नियमांची पायमल्ली होऊ नये म्हणून विवाह सोहळा साध्या पद्धतीने, नियमांचे पालन करून करण्याचे खुद्द आमदार कोकाटे यांनी जाहीर केले होते. तथापि, कार्यक्रम स्थळी उपस्थितांच्या संख्येची मर्यादा पाळली गेली नाही, असे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले.
या सोहळ्यास उपमुख्यमंत्री पवार, पालकमंत्री भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक मंत्री, लोकप्रतिनिधींनी आवर्जून हजेरी लावली. वधू-वर पक्षांचे नातेवाईक, आप्तजनांची संख्या मोठी होती. मुख्य कार्यक्र मासाठी रिसॉर्टमधील खास सभागृहाची निवड करण्यात आली. हजेरी लावणाऱ्यांना गंगापूर धरण समोर दिसेल, अशी सभागृहाची रचना होती. आकाराने लहान असणाऱ्या सभागृहात गर्दी झाली. रिसॉर्टमध्ये प्रवेश करताना आकाराने जे मोठे सभागृह लागते, तिथे वऱ्हाडींच्या भोजनाची व्यवस्था होती. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमास दीडशे ते २०० जणांची उपस्थिती होती. अनेक जण मुखपट्टीविना वावरत होते. लहान सभागृहात सुरक्षित अंतराचे पथ्य पाळले गेले नाही. राष्ट्रवादीचे मंत्री जेव्हा वधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी आले, तेव्हा छायाचित्र काढतानाही गर्दी झाली होती. सोहळ्यात करोनाच्या नियमांचा अनेकांना विसर पडल्याचे दिसत होते. त्यामुळे संबंधितांवर कारवाई होते की नाही याकडे सर्वसमान्यांचे लक्ष लागले आहे.
कारवाईबाबत साशंकता
करोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यावर सामान्यांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या यंत्रणा या सोहळ्यातील नियम उल्लंघनाबाबत कारवाई करतील की नाही, याबद्दल अनेकांना साशंकता आहे. कारण काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलीचा विवाह सोहळा गंगापूर रस्त्यावरील लॉन्समध्ये दिमाखात पार पडला होता. त्या वेळी करोनाची नियमावली लागू होती. सोहळ्यात प्रचंड गर्दी झाली. नियमांचे सर्रास उल्लंघन झाले. त्याची छायाचित्रे, चित्रफिती समाजमाध्यमावर पसरल्या. तथापि, यंत्रणेने कारवाईबाबत मौन बाळगणे पसंत केले होते. या वेळी त्यापेक्षा वेगळे काही घडणार नसल्याची भावना सामान्यांमधून उमटत आहे.
नियमांचे काटेकोरपणे पालन
आमदार कोकाटे यांच्या कन्येच्या विवाह स्वागत सोहळ्यात आपण गेलो, तेव्हा सर्व उपस्थितांनी मुखपट्टी परिधान केलेली होती. सुरक्षित अंतराच्या पथ्याचेही पालन केलेले होते. करोनाची बंधने पाळणे प्रत्येकास आवश्यक आहे. अशा कार्यक्रमात गर्दी करून चालत नाही. काही बाबतीत नाइलाज असतो. एखादी चूक झाली तर आपण चूक म्हणतो.
– अजित पवार (उपमुख्यमंत्री)