आरक्षणासाठी लढणाऱ्या दोन नेत्यांची भेट ; खासदार संभाजीराजे यांची छगन भुजबळ यांच्याशी चर्चा

आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वानी एकत्रित आल्यावर आपल्याला न्याय मिळणार असल्याकडे राजेंनी लक्ष वेधले.

नाशिक : भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या येथील तासाभराच्या भेटीनंतर उभयतांनी परस्परांवर स्तुती सुमनांचा वर्षांव केल्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे हे प्रारंभापासून आग्रही भूमिका घेऊन लढा देत आहेत. दुसरीकडे ओबीसी घटकाचे स्थगित झालेले राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी भुजबळ हे शासन आणि महात्मा फुले समता परिषदेमार्फत न्यायालयीन, राजकीय संघर्ष करीत आहेत. सध्याची स्थिती उभय नेत्यांना जवळ घेऊन आल्याचे मानले जाते.

संभाजी राजेंची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. यावेळी त्यांनी मी जरी वंशज असलो तरी मंत्री छगन भुजबळ यांनी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालविला असून ते त्यांच्या विचारांचे खरे वारसदार असल्याचे प्रशस्तीपत्रक दिले. भेटीत छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षांच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा झाली. यानिमित्ताने छत्रपती शाहू महाराज यांचे विचार जगभरात पोहचविण्यासाठी संधी असून त्या दृष्टीने संयुक्तपणे प्रयत्न करण्याचे निश्चित झाले. मराठा आणि ओबीसी हा कुठलाही वाद नाही. बहुजन समाजासाठी आपला लढा आहे. फार थोडे लोक असा वाद करतात. त्याला आपला विरोध आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वानी एकत्रित आल्यावर आपल्याला न्याय मिळणार असल्याकडे राजेंनी लक्ष वेधले.

हे वाचले का?  नाशिक : रस्त्यांवरील मंडपांमुळे वाहतुकीला अडथळा

छगन भुजबळ यांनी छत्रपती शाहू महाराज हे आमचे देव असून फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर आम्ही काम करत असल्याचे भेटीनंतर सांगितले. सहा मे रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कार्यक्रमाच्या निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद वर्षभर सामाजिक उपक्रम राबविणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली जाईल. बहुजन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही एकमेकांना ताकद देणार असल्याचे भुजबळांनी सांगितले. सध्या देशात जे वातावरण आहे, त्याबद्दल वेगळं सांगायला नको, असे सांगत त्यांनी फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार देशाला या दलदलीतून वाचवू शकतात, असे नमूद केले.

हे वाचले का?  अजित पवार गटाकडून आमदारांना संधी, चार जणांना एबी अर्ज, तिघे बाकी

मागील काही वर्षांत मराठा आरक्षण आणि अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने खा. संभाजी राजे यांचे नाशिकला अनेकदा येणे जाणे झाले आहे. एका आंदोलनाच्या निमित्ताने त्यांची भुजबळांशी भेट झाली होती. तेव्हा भुजबळांनी घरी येण्याचे दिलेले आश्वासन राजेंनी या भेटीतून पूर्ण केले. ओबीसी आरक्षणाच्या तिढय़ावरून भाजप महाविकास आघाडीला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करीत आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडून ओबीसींची नव्याने मोट बांधली जात आहे. या स्थितीत ओबीसींचा नेता ही प्रतिमा टिकवण्यासाठी भुजबळांना या भेटीतून बरेच काही साध्य झाले. संभाजी राजे हे राष्ट्रपतीनियुक्त खासदार असले तरी ते भाजपच्या पाठिंब्यानेच खासदार झाले आहेत. भाजपची भूमिका ते उघडपणे मांडत नाहीत. आपण कोणत्याही एका पक्षाचे नव्हे तर, राष्ट्रपतीनियुक्त खासदार असल्याचे ते सांगत असतात. विरोधकांच्या नावाने वैयक्तिक टीका टिप्पणी करण्याचे टाळतात, असे अनेकदा दिसून येते. मराठा आरक्षणाविषयी आंदोलन करतानाही त्यांनी कधीच इतर संघटनांप्रमाणे आक्रस्ताळेपणा केलेला नाही. उलट आरक्षणासाठी वेळ पडलीच तर दिल्लीतही कार्यकर्त्यांसह धडक देण्याचे त्यांनी काही वेळा सांगितले असल्याने भाजपची मात्र त्यामुळे पंचाईत झाल्याचे दिसून आले आहे. त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. भाजपकडून त्यांना पुन्हा संधी दिली जाईल की नाही, याची अद्याप स्पष्टता झालेली नाही. आरक्षणासह राज्यातील महापालिकांसह इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भुजबळ – खा. संभाजी राजेंच्या भेटीतील अर्थ राजकीय पटलावर शोधले जात आहेत. भाजपही या भेटीमुळे सावध झाली नसेल तरच नवल.