आषाढीपाठोपाठ कार्तिकी वारीवर निर्बंध

पंढरपूरचे अर्थकारणच कोलमडले

लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस भाविकांना असते. शेकडो वर्षांची परंपरा जोपासणाऱ्या संप्रदायाची यंदाच्या पंढरीतील प्रमुख वारी करोना संसर्गामुळे संयमाची वारी ठरली, तर करोनामुळे यंदा चैत्र, आषाढी आणि आता कार्तिकी वारीदेखील अनेक निर्बंध आणि भाविकाविना साजरी होणार आहे. मात्र याचा फटका पंढरपूरच्या अर्थकारणावर पडला असून सारे अर्थकारण पार कोलमडले आहे.

पंढरीत प्रामुख्याने आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यातील प्रमुख वारी म्हणजे आषाढी वारी मानली जाते. शेतकरी जसा मृग नक्षत्राची चातकाप्रमाणे वाट पाहतो त्याचप्रमाणे पंढरीच्या वारीला जाण्याची ओढदेखील लागलेली असते. पहिला पाऊस झाल्यावरशेतीची कामे उरकून पंढरीची वारी करायची हा प्रघात आहे.

वारकरी संप्रदायात आषाढी एकादशीला शयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी देव झोपतो आणि पुढील चार महिन्यांनी कार्तिकीला देवाची म्हणजेच विठ्ठलाची झोप पूर्ण होते. या काळात भाविकांनी आपली शेती, व्यवसाय आदी कामे करावीत असे शेकडो वर्षांपासून संप्रदाय मानत आलेला आहे. तसेच आषाढी वारी म्हणजे पायी वारी. या वारीला सर्व संतांच्या पालखी सोहळाला पंढरीला पायी जातो. पालखी निघताना सकाळ, दुपार, रात्रीचा मुक्काम, रिंगण सोहळा सर्व काही ठरलेल्या तिथीप्रमाणे आणि अतिशय शिस्तबद्ध तसेच व्यवस्थापनेचा एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून याकडे पाहिले जाते, तर परदेशातील अभ्यासक खास करून हे अनुभवण्यासाठी पायी चालत पंढरीला येतात.

हे वाचले का?  पाऊले चालती तुळजापूरची वाट…; कोजागरीनिमित्त शेकडो भाविकांनी रस्ते फुलले

कार्तिकी एकादशीला येणारा भाविक हा शेतातील पिके निघून चार पैसे हातात आल्यावर पंढरीच्या दर्शनाला येतो. ज्या भाविकांना आषाढीला येता आले नाही असे भाविक कार्तिकी वारीला हमखास येतात. कार्तिकीला कोकण, मराठवाडा तसेच शेजारील राज्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून भाविक येतो. मराठी महिन्यातील आषाढी ते कार्तिकी असे चार महिने पंढरीत अनेक महाराज मंडळी भजन, कीर्तन आदी सेवा करतात. या चातुर्मासाची सांगता कार्तिकी वारीला होते.

करोनाचा फटका यंदा बसला आहे. करोना संसर्ग फैलावू नये म्हणून वारीवर निर्बंध आले. मंदिरे दर्शनासाठी बंद झाली. त्यामुळे प्रमुख तीर्थक्षेत्रातील व्यापार ठप्प झाला.

कोटय़वधींची उलाढाल

हे वाचले का?  Ashadhi Ekadashi : ‘बळीराजाचे दुःख दूर कर’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विठुरायाला साकडं; अहिरे दाम्पत्याला महापूजेचा मान

पंढरपूरचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले. मंदिरे बंद म्हणून मंदिर परिसरातील व्यापार बंद. भाविक नाहीत म्हणून लॉज, धर्मशाळा, हॉटेलपासून ते पौरोहित्य करणारे तसेच रस्त्यावर बसून विकणारे फेरीवाले यांना याचा फटका बसला. आषाढी वारीला जवळपास १० ते १२ लाख भाविक पंढरीत येतात आणि ढोबळमानाने १०० कोटींच्या आसपास उलाढाल होते. यात केंद्र, राज्य सरकारचा महसूल धरून उत्पन्न मिळालेच नाही. तर नुकतेच म्हणजेच दिवाळी पाडव्याला राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुले झाली. मात्र काही दिवसांतच कार्तिकी वारी असल्यामुळे पुन्हा मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला. या वारीला जवळपास ५ ते ६ लाख भाविक येतात.  सरासरी ४० ते ५० कोटींची उलाढाल सर्व क्षेत्रांतून होते. मात्र त्यावरदेखील आता पाणी पडणार आहे.

करोनाच्या काळात चैत्री आणि आषाढी वारीच्या काळात सरकारचे नियम आणि भाविकांच्या आरोग्याची काळजी घेतली. प्रसंगी संप्रदायाने शेकडो वर्षांच्या परंपरेला थोडी मुरड घातली. आषाढी वारी जशी प्रातिनिधिक स्वरूपात पण परंपरा जोपासत केली तशी कार्तिकी वारीदेखील करणार आहे. आमच्या सर्व वारकरी संप्रदायाची संयमाची वारी होती. परमात्मा पांडुरंगाला हात जोडून विनंती आहे की, पुढची वारी आम्हा वारकऱ्यांना दर्शनाची घडो.

हे वाचले का?  “हिंदुंनो परत जा”, अमेरिकेत मंदिराची विटंबना; दहा दिवसांतील दुसरी घटना

– ह.भ.प. राणा महाराज वासकर

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर कार्तिकी वारीसाठी भाविकांनी येऊ नये, जेणेकरून गर्दी होऊन आरोग्य धोक्यात येणार नाही. यात्रा संपल्यावर भाविकांनी टप्प्याटप्प्याने गर्दी न होता आणि आरोग्याची काळजी घेत पंढरीला यावे. तूर्तास यात्रा कालावधीत येऊ नये.

– सचिन ढोले, प्रांताधिकारी