इगतपुरीत पुन्हा मुसळधार; तालुक्यातील पाच धरणांमधून विसर्ग; २४ तासांत ६३ मिमी पाऊस

इगतपुरी तालुक्यात पुन्हा दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाला असून रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिक वाढला आहे.

नाशिक : इगतपुरी तालुक्यात पुन्हा दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाला असून रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिक वाढला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने तालुक्यातील पाचही धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. जोरदार पावसामुळे दारणा, वाकी, भाम या नद्यांना पूर आला आहे. दारणा नदीच्या पुराचे पाणी परिसरातील शेतामध्ये शिरल्याने भात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यात २४ तासात ६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दारणा धरणातून सात हजार २४४ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागापेक्षा पश्चिम भागात अधिक पाऊस झाला आहे. पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच भातशेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पूर्व भागात झालेल्या पावसामुळे भातलागवडीच्या कामांना वेग येणार आहे. दारणा, भाम आणि वाकी या नद्यांना पूर आला असून या नद्यांच्या पुराचे पाणी शेतात गेल्याने मोठय़ा प्रमाणात भातशेती उदध्वस्त झाली आहे. काही शेतकऱ्यांचे भाताचे रोप वाहून गेले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगरांवरून धबधबे मोठय़ा प्रमाणात कोसळत आहेत. इगतपुरी, घोटी, मानवेढे, वैतरणा, धारगाव, टाकेद या भागात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला आहे. दोन दिवसांपासून पावसाचे सातत्य कायम आहे  रविवारी रात्री पावसाला अधिकच जोर आला.

हे वाचले का?  नाशिक : शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन

मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची कामे थांबली आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास पिके हातची जाण्याची शक्यता आहे. तालुक्यातील दारणा, भावली, कडवा, मुकणे, भाम या पाच धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. पाऊस असाच सुरु राहिल्यास वाकी धरणातूनही विसर्ग करण्याची वेळ येऊ शकते.  इगतपुरी तालुक्यातील पावसाची आकडेवारी (तालुक्यात आजचा पाऊस ६३ मिमी) आजपर्यंत एकूण पाऊस २४७१ मिमी (७२टक्के) झाला आहे. तालुक्यातील धरणांमधील पाण्याची स्थिती. धरणाचे नाव दारणा (६९.०६ टक्के) सोमवारी दुपापर्यंत पाण्याचा विसर्ग सात हजार क्युसेक, भावली (१०० टक्के) ४८० क्युसेक,  कडवा (७६. १३), ६९८ क्युसेक, वाकी (६२.४४), मुकणे (८८. ५३), सहा हजार ७१७ क्युसेक, भाम (१०० टक्के), १३१० क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.

हे वाचले का?  महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा