‘ईडी’च्या कारवाईत आतापर्यंत राज्यातील तीन नेत्यांना तुरुंगवास

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ईडीने नोटीस बजाविली होती.

शरद पवार यांना फक्त नोटीस

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ईडीने नोटीस बजाविली होती. तेव्हा पवार यांनी स्वत:च ईडीच्या कार्यालयात जाऊन जबाब देण्याची तयारी दर्शविली. पवारांनी ईडी कार्यालयात जाण्याचे जाहीर करताच राज्यात सर्वत्र केंद्र सरकार व भाजप सरकारच्या विरोधात वातावरण तयार झाले होते. तत्कालीन फडणवीस सरकार पार बिचकून गेले. तत्कालीन पोलीस आयुक्तांनी पवारांच्या निवासस्थानी जाऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून ईडी कार्यालयात जाऊ नका, अशी विनंती केली होती. तेव्हापासून आजतागायत पवारांचा ईडीने कधी जबाबही घेतला नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली; पण पुढे काहीच प्रक्रिया झालेली नाही.

हे वाचले का?  राज्यातील ‘या’ प्रसिद्ध धरणाचे नाव बदलले, आता ‘आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय’ म्हणून ओळखले जाणार

२०१४ मध्ये केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून आतापर्यंत राज्यातील चार विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात ‘ईडी’ने कारवाई केली आहे.

  • माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ : दोन वर्षे तुरुंगवास, सध्या जामिनावर
  • माजी गृहमंत्री अनिल देशमुख : नोव्हेंबर २०२१ पासून तुरुंगात
  • माजी मंत्री नवाब मलिक : फेब्रुवारीपासून तुरुंगात
  • संजय राऊत : ताब्यात घेतले

..हे नेते शरण

भाजपमध्ये गेल्यास ‘ईडी’चे संकट टळत असल्याने केंद्रीय यंत्रणेच्या रडारवर असलेल्या काही नेत्यांनी सरळसरळ शरणागती स्वीकारली. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर. सध्या दिवस वाईट असल्याने शिंदे गटात प्रवेश करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले. कारण साखर कारखान्याच्या व्यवहारात ईडीने खोतकर यांची चौकशी सुरू केली होती. प्रताप सरनाईक, भावना गवळी, यशवंत जाधव व त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव  या साऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश करून स्वत:वरील इडापीडा टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

हे वाचले का?  “बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!

भाजपच्या विरोधात बोलणारे तुरुंगात : राज्यात भाजपवर सातत्याने तुटून पडणारे नवाब मलिक आणि संजय राऊत हे दोन नेते होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीशी संबंधित प्रकरण त्यांनी बाहेर काढले होते. केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात ते सातत्याने आवाज उठवीत असत. गेल्या फेब्रुवारीमध्ये ईडीने त्यांना अटक केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे दररोज सकाळी भाजप व केंद्राच्या धोरणांच्या विरोधात आवाज उठवीत असत. तसेच भाजप नेत्यांवर आरोप करीत मलिक किंवा राऊत हे भाजपच्या दृष्टीने त्रासदायक ठरले होते. या दोन्ही नेत्यांच्या विरोधात ईडीने कारवाई केली आहे.