उड्डाणपुलांची गरज तपासणार

शहरातील उंटवाडी येथील प्रस्तावित उड्डाणपुलासाठी वटवृक्ष तोडला जाणार नाही.

वटवृक्षासह प्राचीन वृक्ष वाचविण्याची आदित्य ठाकरे यांची ग्वाही

नाशिक : शहरातील उंटवाडी येथील प्रस्तावित उड्डाणपुलासाठी वटवृक्ष तोडला जाणार नाही. शाश्वत विकासाच्या नावाखाली १०० वर्षांपूर्वीची झाडे कापली जाणार नाहीत. विकासकामे करताना पर्यावरण संवर्धन कसे होईल याचा विचार करण्याची आवश्यकता असून सिडकोत उड्डाणपुलाची खरंच गरज आहे की नाही हेदेखील तपासले जाईल, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. शहरातील उंटवाडी आणि मायको चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलासाठी प्राचीन वटवृक्षासह शेकडो झाडे तोडण्यात येणार आहेत. यात अ़ड़ीचशे वर्षांच्या वटवृक्षासह ५८८ झाडांचा समावेश आहे. त्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे दाद मागितली होती. तेव्हा ठाकरे यांनी पालिका आयुक्तांशी चर्चा करून वटवृक्षासह शक्य तेवढी झाडे वाचविण्याची सूचना केली होती. गरज भासल्यास उड्डाणपुलाच्या आराखडय़ात बदल करण्यास सुचवले होते.

शुक्रवारी ठाकरे यांनी उंटवाडीतील प्राचीन वटवृक्षाची पाहणी केली. उड्डाणपुलाच्या कामात वटवृक्षासह ४५० झाडांचे संवर्धन कसे होईल, कमीत कमी झाडे तोडावी लागतील यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेत. नाशिककरांनी काळजी करण्याची गरज नाही. वटवृक्ष वाचणार असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. या वेळी नंदिनी नदीची पाहणी त्यांनी केली. नदीला संरक्षक भिंत बांधण्यासाठी समिती गठित करावी, असेही त्यांनी सूचित केले. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने या उड्डाणपुलांसाठी पुढाकार घेतला होता. सिडकोत या पुलाची गरज काय, असे सांगत पालकमंत्री छगन भुजबळ  यांनी त्यास आधीच विरोध केला. आता शिवसेनेच्या मंत्र्यांनी उड्डाणपुलाची गरज तपासणार असल्याचे म्हटले आहे. पुलास वाढता विरोध लक्षात घेऊन भाजपने त्याचा पुनर्विचार सुरू केला आहे.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यात ‘एलडीओ’ नावाखाली डिझेलची अवैध विक्री; पेट्रोलपंप चालकांचा बंदचा इशारा

ब्रह्मगिरीबाबत जिल्हा आणि पोलीस प्रशासनाचे मौन का?

ब्रह्मगिरी उत्खनन प्रकरणात वन विभागाने जिल्हा प्रशासनास अहवाल सादर केला; परंतु जिल्हा प्रशासनाकडून शासनास कुठलाही लेखी अहवाल दिला गेला नसल्याची तक्रार करत जिलेटीन कांडय़ांच्या स्फोट प्रकरणातदेखील स्थानिक पोलीस व जिल्हाधिकारी कार्यालयाने मौन का बाळगले आहे, असा प्रश्न ब्रह्मगिरी कृती समितीने पर्यावरणमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केला. अंजनेरी, ब्रह्मगिरी रोप वे आणि अंजनेरीवर जाण्यासाठी कोणत्याही मार्गाने रस्ता होऊ नये म्हणून शासनाने अधिसूचना काढण्याची गरज आहे. ब्रह्मगिरीची ४० मैलांच्या फेरीचा परिसर संवेदनशील पर्यावरण क्षेत्र म्हणून जाहीर करावे, जिल्ह्यातील वन विभागाच्या जमिनी आणि वनविरहित झालेल्या जमिनींची मोजणी करावी, सारूळ, संतोषा भांगडा येथे छुप्या पद्धतीने खाणी सुरू असून त्या कायमस्वरूपी बंद कराव्यात, आदी मागण्या समितीचे प्रशांत परदेशी, वैभव देशमुख, अंबरीश मोरे, मनोज साठे यांनी केल्या आहेत.

हे वाचले का?  पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा

बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे भूमिपूजन

शहरातील गंगापूर रोड परिसरात पालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचार व जीवनशैलीवर आधारित स्मृती उद्यान उभारण्यात येणार असून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या वेळी ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असून त्यासाठी हे संग्रहालय महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल, असे नमूद केले. बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयाच्या उर्वरित जागेत हे उद्यान करण्यात येत आहे. उद्यानात बाळासाहेबांनी काढलेल्या काही व्यंगचित्रांचे कलादालन, त्यांच्या भाषणाच्या ध्वनिफिती, चित्रफिती आणि मुलाखतींचा अमूूल्य ठेवा असलेले दालन राहणार आहे. २०० आसनी प्रेक्षागृहदेखील उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गडकिल्ल्यांची प्रतिकृती उभारून गडकिल्ल्यांची माहिती देणारे दालनही करण्यात येणार आहे.

हे वाचले का?  तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकमध्ये भक्तांची गर्दी