उत्तर प्रदेशात पावसाचे १० बळी

देशभरात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर मुसळधार पावसाने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सोमवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे वेगवेगळ्या दुर्घटना घडून १० जणांचा मृत्यू झाला आहे. गंगा, राप्ती आणि शारदा या नद्या वेगवेगळ्या ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

देशभरात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर मुसळधार पावसाने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. आसामला मोठ्या प्रमाणात पुराचा तडाखा बसला असून मंगळवारी वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला. तर उत्तराखंडमध्ये गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसात तीन जणांचा मृत्यू झाला.

हे वाचले का?  Lockdown Effect on Moon : पृथ्वीवरील ‘कोविड लॉकडाउन’मुळे चंद्राच्या तापमानात घट; अभ्यासातील निष्कर्ष

राजधानी दिल्लीमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. तसेच वाहतुकीचा खोळंबा झाला. अनेक ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

राजस्थानात सर्वदूर पाऊस पडत असून जयपूर आणि सवाई माधोपूर येथे २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस पडला, तर अन्य काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या.

पश्चिम बंगालच्या उत्तर भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून ११ जुलैपर्यंत तिथे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने मंगळवारी व्यक्त केला. कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. उडुपी पुत्तुर येथे राष्ट्रीय महामार्ग ६६चा काही भागदेखील पाण्यात बुडाला. दक्षिण कन्नड जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी केला असून शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवली आहेत.

हे वाचले का?  Jammu and Kashmir Exit Polls 2024: जम्मू-काश्मीरमध्ये भरघोस मतदान, आता सत्ता कुणाची? Exit Poll कधी येणार?