उदगीर येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित उदयगिरी महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षांची पार्श्वभूमी या संमेलनाला आहे.
लातूर : उदगीर येथे येत्या २२ ते २४ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह पुणे येथील किरण कुलकर्णी, जयंत पवार यांनी तयार केले आहे. उदगीर परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक जीवनाचे प्रतिबिंब या बोधचिन्हात साकार झाले आहे.
उदगीर येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित उदयगिरी महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षांची पार्श्वभूमी या संमेलनाला आहे. साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हात एक लखोटा दाखविण्यात आला असून त्याला उदगीर शहराच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची जोड देण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त राष्ट्रध्वजाच्या रंगातील टाक आहे. हे संमेलन ग्रामीण भागात होत असल्याने येणाऱ्या साहित्यप्रेमींना आम्ही पंचतारांकित सुविधा देऊ शकणार नाही पण सर्वाची आत्मीयतेने आणि घरच्यासारखी काळजी घेतली जाईल, असे संमेलनाचे कार्याध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील-नागराळकर यांनी सांगितले.
बोधचिन्ह असे असेल
संमेलनाच्या बोधचिन्हात चार ‘म’ असून सीमावर्ती भागात संमेलन होत असल्यामुळे मराठीतल्या ‘म’ बरोबरच उर्दू, कन्नड आणि तेलगू या तीन भाषेतील ‘म ’चा यात समावेश आहे. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाची सुरुवात १९६२ मध्ये झाली. त्या वेळी उदगीर परिसरात कापसाचे विक्रमी पीक येत असे, कापसाच्या प्रति क्विंटल मागे पाच पैसे कर आकारण्यात आला आणि त्या करातून ही संस्था उभारली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी कापसाचे बोंड त्यात दाखवण्यात आले आहे. साहित्याचे प्रतीक म्हणून पुस्तक, बालाघाट रांगांच्या परिसरात संमेलन होत असल्याने त्याचेही प्रतिबिंब यात आहे. बोधचिन्हाच्या खालच्या बाजूला किल्ला दाखविण्यात आला आहे. उदगीर येथे पानिपतच्या युद्धाची सुरुवात झाली आणि त्यात विजय मिळविला. त्यामुळे किल्ल्याची प्रतिकृती बोधचिन्हावर आहे.