‘उदे ग अंबे उदे’ चा जयघोष!

करोनाच्या पार्श्वभूमीवर, दोन प्रतिबंधक लस घेतलेल्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जात आहे.

वणी : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या सप्तश्रृंग देवीच्या नवरात्रोत्सवास गुरूवारपासून सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी मंदिरात दर्शन घेतले. सकाळी  नाशिकचे प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या हस्ते देवीची महापूजा करण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हा सत्र न्यायाधिश व देवी संस्थानचे अध्यक्ष वर्धन पी. देसाई उपस्थित होते.

दुपारी पालकमंत्री छगन भुजबळ याच्या हस्ते आरती करण्यात आली. तसेच सकाळी संस्थानच्या कार्यालयातून देवीच्या अलंकारांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येऊन नंतर अभिषेक करून देवीची आरती  करण्यात आली. अकरा वाजता घटस्थापना करण्यात आली. भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे म्हणून लोखंडी जाळीमधून सोडण्यात येणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर, दोन प्रतिबंधक लस घेतलेल्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जात आहे.

हे वाचले का?  Tirupati Laddu : चरबीनंतर आता तंबाखू? तिरुपती बालाजीच्या प्रसादाबाबत भाविकाचा गंभीर दावा, VIDEO व्हायरल

प्रवेशद्वार जवळ ऑनलाइन पास घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. ऑनलाइन नोंदणीत अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. संकेतस्थळ काही वेळ चालत नसल्याने भक्तांना मनस्ताप सहन करावा लागला. नवरात्रौत्सवात गडावर खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. गडावर येण्यासाठी एसटी महामंडळाने बसची व्यवस्था केली. नांदुरी येथुन निम्म्या क्षमतेने बस चालविल्या जात आहे. गडावरील शिवालय तलावात स्नानास मनाई करण्यात आली आहे. भाविकांनी तलावाकडे जाणारा प्रयत्न करू नये असे आदेश काढण्यात आले आहे. नवरात्रीत मंदिर २४ तास भक्तांसाठी खुले राहणार आहे. नऊ दिवस मोफत महा प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे वाचले का?  पाऊले चालती तुळजापूरची वाट…; कोजागरीनिमित्त शेकडो भाविकांनी रस्ते फुलले