उद्योगांवरील मळभ दूर करण्यास ‘आयमा इंडेक्स’चा हातभार; प्रदर्शनास दीड लाख नागरिकांची भेट

अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (आयमा) वतीने आयोजित ‘आयमा इंडेक्स-२०२२’ या औद्योगिक प्रदर्शनात सोमवारी गर्दीचा उच्चांक गाठला गेला.

नाशिक : अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (आयमा) वतीने आयोजित ‘आयमा इंडेक्स-२०२२’ या औद्योगिक प्रदर्शनात सोमवारी गर्दीचा उच्चांक गाठला गेला. पाचदिवसीय प्रदर्शनात एक लाख नागरिक भेट देतील, असा अंदाज होता. प्रत्यक्षात हा आकडा दीड लाखाच्या पुढे गेला. प्रदर्शनात हजारो कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. स्थानिक लघू उद्योजकांची बडय़ा उद्योग प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा झाली. यामुळे करोनाच्या संकटात उद्योग क्षेत्रावर दाटलेले मळभ दूर होण्यास हातभार लागणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

गंगापूर रस्त्यावरील डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित आयमा इंडेक्स २०२२ या औद्योगिक प्रदर्शनाचे सोमवारी सूप वाजले. कडाक्याचे ऊन असतानाही प्रदर्शन बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सोमवारी गर्दीचा उच्चांक झाला. नामांकित कंपन्यांच्या अधिकारी आणि प्रतिनिधींनी प्रदर्शनातील दालनांना भेटी दिल्या. उत्पादनांची माहिती जाणून घेऊन मालास उठाव कसा मिळेल, याबाबतची रणनीती सांगितली. काहींनी स्थानिकांची उत्पादने खरेदी करण्याचे आश्वासन दिले. नामांकित उद्योगांच्या प्रतिनिधींशी झालेल्या सकारात्मक चर्चेने लघू-मध्यम उद्योजकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले. या काळात नाशिकमध्ये गुंतवणुकीस काही मोठय़ा उद्योगांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पहिल्याच दिवशी ८५० कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. पुढे त्यात आणखी वाढ झाली. नाशिकच्या उद्योग विश्वाला या प्रदर्शनातून बळ मिळाल्याचे प्रदर्शनाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी म्हटले आहे.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

अखेरच्या दिवशी गर्दी वाढली

अखेरच्या दिवशी प्रदर्शन बघण्यासाठी ७५ हजारहून अधिक लोकांनी गर्दी केली. विशेष म्हणजे विविध शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी गटागटाने आले होते. आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळय़ा कामांची जबाबदारी स्वीकारली होती. सर्वानी आपापली जबाबदारी योग्य प्रकारे पार पडल्याने प्रदर्शन यशस्वी होण्यास मदत झाल्याचे आयमाचे विद्यमान अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी सांगितले. 

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

३६५ उद्योजकांचा सहभाग

करोनाचे संकट ओसरल्यानंतर ३६५ उद्योजकांनी धाडस दाखवत प्रदर्शनात आपले दालन लावले. त्यांचाही या यशात महत्त्वाचा वाटा असल्याचे आयमाचे कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे यांनी सांगितले. प्रदर्शनातून उद्योजकांचा दांडगा उत्साह प्रतीत झाल्याचे नमूद केले. प्रदर्शनात ३२५ दालनांचे उद्दिष्ठ असताना ३६५ दालन उभारावे लागले. सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाची साथ दिल्यामुळे उद्योजकांचा आनंद द्विगुणीत झाल्याचे कोठावदे यांनी सांगितले.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली