उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

या महिलेला प्रारंभी करोना कक्षात ठेवले, परंतु चार दिवस नमुनेसुद्धा घेतले गेले नाहीत.

अशोका मेडिकव्हरमध्ये नातेवाईकांचा गोंधळ; लाखो रुपये खर्चूनही उपचारात हलगर्जीचा आरोप

नाशिक : शहरातील अशोका मेडिकव्हर रुग्णालयात योग्य पद्धतीने उपचार न केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मंगळवारी सकाळी व्यवस्थापनाला जाब विचारत संतप्त प्रतिकिया व्यक्त केली. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना समोर आणण्याची मागणी करण्यात आली. या घटनाक्रमामुळे रुग्णालयात गोंधळ उडाला. रुग्णालयाकडून अवास्तव देयकाची आकारणी, लाखो रुपये भरूनही उपचारात हलगर्जीपणा, करोना चाचणीस विलंब, चाचणी नकारात्मक येऊनही रुग्णास करोना कक्षातून न हलविणे, असे अनेक आक्षेप नातेवाईकांनी नोंदविले. करोनाबाधितांकडून भरमसाट देयक आकारणीवरून महापालिकेने यापूर्वीच अशोका मेडिकव्हरविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

अशोका मेडिकव्हरमध्ये उपचार घेणाऱ्या पुष्पा किरण सानप (३४) या महिलेचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. करोनाबाधित महिला काही दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी दाखल झाली होती. प्रसूती झाल्यानंतर तिची तब्येत बिघडली. काही दिवस अतिदक्षता कक्षात उपचार केल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले. परंतु पाच दिवसांनी पुन्हा ताप वा तत्सम लक्षणे आढळल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वेळी उपचारात हलगर्जीपणा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेची बहीण दीपाली चवले आणि नातेवाईक अजय आव्हाड यांनी केला.

हे वाचले का?  मुसळधार पावसाचा ३८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका; चांदवड, देवळा, पेठमध्ये सर्वाधिक नुकसान

या महिलेला प्रारंभी करोना कक्षात ठेवले, परंतु चार दिवस नमुनेसुद्धा घेतले गेले नाहीत. नंतर अहवाल नकारात्मक आला. त्यामुळे  रुग्णास अन्य कक्षात हलविण्याची मागणी केली असता रविवारचे कारण देऊन टाळाटाळ करण्यात आली.

वाद घातल्यानंतर रुग्णास अन्य कक्षात हलविले, पण तिथे कोणी लक्ष देत नव्हते.

प्रसाधनगृहात स्वच्छता करायला कोणी नव्हते. जुलाबाने रुग्णाच्या शरीरातील पाणी कमी झाले. हृदयविकारावरील इंजेक्शन हातातून दिले जात नाही, तरी डॉक्टरांनी ते हातात दिले. रुग्णाचा रात्री मृत्यू झाल्यानंतरही पार्थिव सकाळपर्यंत अतिदक्षता कक्षात ठेवले गेले, असे आरोप नातेवाईकांनी केले.

महिनाभराच्या उपचारात तब्बल १९ लाखांचे देयक आम्ही भरले. कधी कधी पुढील देयक भरण्यास एका दिवसाचा विलंब झाला तरी व्यवस्थानाकडून औषधे देणे, उपचार थांबविले जात होते, असा गंभीर आरोपही नातेवाईकांनी केला. रुग्णाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर रुग्णालयाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली जाणार असल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. रुग्णालयातील गोंधळामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई नाका पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. काही काळ बंदोबस्त तैनात करण्यात आला.

हे वाचले का?  फिरत्या पथकाची आता खाणींवर नजर, वन विभागाच्या आश्वासनानंतर ब्रम्हगिरी कृती समितीचे आंदोलन स्थगित

रुग्णालयाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न

संबंधित रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेल्यानंतर पाच दिवसांनंतर पुन्हा अत्यवस्थ परिस्थितीत रुग्णालयात दाखल झाले. परंतु या वेळी रुग्णाने उपचारांना योग्य तो प्रतिसाद न दिल्याने तो दगावला. रुग्णाच्या नातेवाईकांनी देयकात सवलत देण्याची केलेली मागणी व्यवस्थापनाने मान्य केली, परंतु तरीही काही नातेवाईकांनी गदारोळ सुरू ठेवला. रुग्णालय बंद करू, डॉक्टरांची नोंदणी रद्द करू, आमचे संपूर्ण पैसे परत करा नाही तर माध्यमांना बोलावू, कक्षात काम करणाऱ्या डॉक्टरांना आमच्यासमोर हजर करा, अशी मागणी करून गोंधळ घातला. या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांना बोलावून रुग्णालयावरील संभाव्य हल्ला रोखण्यात आला. रुग्णाच्या नातेवाईकांनी रकमेबाबत जो आक्षेप घेतला त्यात रुग्ण दोन वेळा आणि बाळ एकदा रुग्णालयात दाखल असतानाचे मिळून ते देयक आहे. परंतु ही बाब मुद्दाम लपविण्यात येत आहे. हे सर्व प्रकरण रुग्णालयाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्यासाठी केलेले दिसून येते. ज्या परिस्थितीत आई आणि बाळ वाचण्याची शक्यता कमी

असतानाही दोघे सुखरूप घरी गेले होते. पण आई पुन्हा आजारी पडल्याने तिचे निधन झाले. रुग्णालय व्यवस्थापनास बाळ वाचविण्यात यश आले आहे.

हे वाचले का?  नाशिक: पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेसला विलंब, रेल्वेला नोटीस

– अशोका मेडिकव्हर रुग्णालय

‘अशोका’विरोधात वाढत्या तक्रारी

करोनाबाधितांवर उपचारात शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा खासगी रुग्णालये अवाच्या सवा रक्कम रुग्णांच्या नातेवाईकांकडून घेऊन त्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याच्या असंख्य तक्रारी आतापर्यंत महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. महापालिकेने लेखापरीक्षक नियुक्त करून करोनाबाधितांवरील उपचाराची देयके तपासणीचे काम सुरू केले. या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींच्या चौकशीत अशोका मेडिकव्हरने चार रुग्णाांकडून तीन लाख ८० हजार रुपये अधिक घेतल्याचे उघड झाले होते. ही रक्कम रुग्णांना परत देण्यास वारंवार सांगूनही ‘अशोका’ने दाद दिली नसल्याने महापालिकेच्या तक्रारीवरून संबंधित रुग्णालयावर याआधी गुन्हा दाखल झालेला आहे.